हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील दूध उत्पादकांसाठी ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना (Dairy Scheme) राबविली जात आहे. मागील आठवड्यात प्रजासत्ताक दिनी या योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या लाभार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवसासह तीन दिवस दिल्ली येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता. मात्र, आता ही ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना काय आहे? ही योजना सुरु झाल्यानंतर देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Scheme) किती फायदा झाला? याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत…
‘नवीन योजनेला असेल ‘गोकुळ’ची झालर’ (Dairy Scheme For Farmers)
विशेष म्हणजे 2024 या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात डेअरी क्षेत्रासाठी एक योजना (Dairy Scheme) बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ ही योजना सुरु झाल्यानंतर मागील आठ वर्षात देशातील दूध उत्पादनात 74 दशलक्ष टन इतकी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे आता अर्थसंकलपात घोषित झालेली नवीन योजना बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेच्या यशाचा आधार घेतला जाऊ शकतो. याशिवाय राष्ट्रीय पशुधन मिशन, डेअरी प्रोसेसिंग आणि अन्य पशुपालनासंदर्भातील योजनांच्या यशाचा देखील यासाठी आधार घेतला जाऊ शकतो.
योजनेचा उद्देश काय?
केंद्र सरकारकडून ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना’ 2014 साली छोट्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन सुरु करण्यात आली होती. सुरुवातीच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये या योजनेसाठी सरकारकडून 2400 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांकडे देशी गाय-म्हैस यांच्या प्रजातीच्या वाढीला प्रोत्साहन देणे हा होता. सोबतच देशातील दुधाची वाढती मागणी लक्षात घेता दूध उत्पादन वाढवणे, हा देखील त्यामागील उद्देश होता. हे दोन्ही उद्देश योजनेच्या माध्यमातून मागील दशभरात साध्य झाले आहेत. वर्ष 2013-14 मध्ये देशातील दुधाळ जनावरांची संख्या 84.09 दशलक्ष इतकी होती. जी 2021-22 मध्ये 120.19 दशलक्ष इतकी झाली आहे.
दूध उत्पादनात वाढ
केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेच्या माध्यमातून देशातील दूध उत्पादनात लगातार वाढ होत आहे. 2014-15 मध्ये देशातील दूध उत्पादन 146.31 दशलक्ष टन इतके होते. जे 2021-22 मध्ये वाढून 220.78 दशलक्ष टनांपर्यंत पोहचले आहे. अर्थात मागील आठ वर्षात देशातील दूध उत्पादनात 74 दशलक्ष टन इतकी वाढ नोंदवली गेली आहे.
कुठे आहेत ‘गोकुळ ग्राम’
केंद्र सरकारने देशातील 13 राज्यांमध्ये एकूण 16 गोकुळ ग्राम उभारले आहेत. कर्नाटक ते हिमाचल प्रदेशपर्यंत हे गोकुळ ग्राम बनवण्यात आले आहे. राज्यनिहाय गोकुळ ग्रामची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आंध्रप्रदेश-1, तेलंगणा-1, गुजरात-1, मध्य प्रदेश-1, पंजाब-1, हरियाणा-1, अरुणाचल-1, बिहार-1, छत्तीसगड-1, उत्तर प्रदेश-3, महाराष्ट्र-2, कर्नाटक-1, हिमाचल प्रदेश-1 गोकुळ ग्राम स्थापन करण्यात आले आहे.