Dog Race : कुत्रीने शेतकऱ्याला जिंकून दिल्या 4 बाईक, 3 फ्रीज, 6 चांदीच्या गदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही आजपर्यंत बैलगाडा शर्यत, घोड्यांच्या टांग्याची शर्यत (Dog Race) अशा अनेक पारंपरिक शर्यती ऐकल्या असतील. इतकेच नाही तुम्ही स्वतः त्यात भागही घेतला असेल. मात्र आता एका कुत्र्याने शेतकऱ्याला शर्यतींमध्ये 4 मोटरसायकल जिंकून दिल्याचे कधी ऐकलेय का? नाही ना? तर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील एका शेतकऱ्याने राजमुद्रा नावाची कुत्री पाळली असून, या कुत्रीने आजपर्यंत चार शर्यतींमध्ये शेतकऱ्याला 4 मोटारसायकली मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे सध्या या राजमुद्रा नावाच्या कुत्रीची (Dog Race) सर्वत्र चर्चा होत आहे.

अनेक बक्षिसे जिंकली (Dog Race Farmer Wins 4 Bikes)

सुरज जाधव असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते पुसेगावचे रहिवासी आहेत. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीची हौस असते. अगदी त्याच संकल्पनेतून आपण राजमुद्रा नावाच्या कुत्रीचे संगोपन करत आहोत. ती आपल्याला चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. आतापर्यंत शर्यतीमध्ये तिने आपल्या चार बाईक, तीन फ्रीज, सहा चांदीच्या गदा मिळवून दिल्या आहेत. इतकेच नाही तर जवळपास 31 वेळा ती विविध स्पर्धांमध्ये चॅम्पियन ठरली आहे. त्यामुळे आपण तिला खूप जपतो. असेही ते सांगतात.

ग्रेहाऊंड जाती निवड

आपण श्वान शर्यतीसाठी ग्रेहाऊंड जातीच्या श्वानाची निवड केली असून, त्यास चिकन आणि भाकरी दिली तरी त्यांची योग्य रीतीने वाढ होते. यासाठी बाजारात खास श्वानांसाठीचे अनेक पदार्थ मिळतात. त्याचाही वापर करतो. या जातीच्या कुत्र्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे श्वान शर्यत ही शेतकऱ्यांसाठी उत्तम ठरणार असून, अनेक शेतकऱ्यांनी अर्थार्जनासाठी यात उतरण्याची गरज आहे. असे सुरज जाधव सांगतात.

अर्थार्जनाचा चांगला मार्ग

श्वानाच्या संगोपनाला जास्त खर्चही येत नाही. बैल किंवा इतर प्राण्यांचा शर्यतीसाठी वापर केला जातो. मात्र हे प्राणी शेतकऱ्यांना पोसणे तितकेसे सोपे नसते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी श्वान शर्यतीसाठी जातिवंत कुत्र्यांचे संगोपन करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यांच्या आहारावर होणार खर्च हा देखील कमी असतो. त्यामुळे सामान्य शेतकरी देखील या श्वानाचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून शर्यतीत सहभाग घेऊ शकतात, असेही सुरज जाधव शेवटी सांगतात.

error: Content is protected !!