हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, आता औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन (Drone Business) उपलब्ध झाले आहेत. मात्र या ड्रोनची किंमत ही अधिक असल्याने शेतकरी ते खरेदी करू शकत नसल्याचे पाहायला मिळते. मात्र फवारणीसाठीचा ड्रोन किती रुपयांमध्ये उपलब्ध होतो. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हीही कशा पद्धतीने व्यवसाय करू शकता? याबाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सध्या तरी शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी वैयक्तिक पातळीवर ड्रोन खरेदी (Drone Business) करणे परवडणारे नाही. नव्याने बाजारात दाखल झाल्याने या ड्रोनच्या किमती अधिक असल्याचे दिसून येते. साधारणपणे 10 लिटर क्षमतेच्या ड्रोनची किंमत ही आज बाजारात 6 ते 10 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे पाहायला मिळते. सध्या बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत. ज्या शेतीसाठी ड्रोन पुरवठा करत आहेत. म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये एखाद्या पिकाला औषध फवारणी किंवा पिकाची आरोग्य तपासणी करायची असेल तर या कंपन्या एका फोन कॉलवर तुम्हाला सर्व्हीस उपलब्ध करून देतात. या कंपन्या शेतकऱ्यांकडून फवारणीसाठी प्रति एकर विशिष्ट रकमेची आकारणी करतात.
किती मिळेल मोबदला? (Drone Business Spraying For Farming)
अगदी अशाच पद्धतीने तुम्ही देखील ड्रोन खरेदी करून, स्वतःची शेती करण्यासह चांगला व्यवसाय करू शकता. एका रिपोर्टनुसार, ड्रोन कंपन्या या प्रामुख्याने प्रति एकर फवारणीसाठी शेतकऱ्यांकडून 500 रुपये आकारणी करत आहेत. मात्र आता तुम्ही देखील ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग घेऊन, आपल्या गावात शेतकऱ्यांकडून एकरी मोबदला घेऊन औषध फवारणी व्यवसाय सुरु करतात. हे ट्रेनिंग ड्रोन खरेदी केल्यानंतर संबंधित कंपनी तुम्हाला उपलब्ध करून देईल.
कुठून कराल ड्रोन खरेदी?
ड्रोन खरेदी करण्यासाठी आपण नामांकित कंपनीकडे चौकशी करून खात्रीशीरपणे शेतीसाठीच्या ड्रोनची खरेदी करू शकतात. देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने, शेतकरी सध्या तरी वैयक्तिक ड्रोनचा वापर करू शकणार नाही. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ड्रोनद्वारे शेतीमध्ये औषध फवारणी करून, व्यवसायातून चांगली कमाई केली जाऊ शकते. विशेष म्हणजे तुम्हाला तो आपल्या वैयक्तिक शेतीसाठी देखील वापरता येणार आहे.