हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी (Drought) परिस्थिती असून, त्या-त्या राज्यांकडून सध्या शेतकऱ्यांना आपआपल्या पातळीवर मदत दिली जात आहे. अशातच आता झारखंड सरकारकडून राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला 3500 रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांची पिके ही 33 टक्क्यांपर्यंत खराब झाली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी, असे आदेश झारखंड सरकारकडून मदत व पुनर्वसन विभागाला देण्यात आले आहे. याचा झारखंडमधील जवळपास 14 लाख दुष्काळग्रस्त (Drought) शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
17 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती (Drought In Jharkhand)
यावर्षी देशातील हवामानावर एल-निनोचा प्रभाव असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांकडून याआधीच दुष्काळ (Drought) घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे झारखंड सरकारकडूनही मंत्रिमंडळ बैठक घेत राज्यातही जवळपास 17 जिल्ह्यांमधील 158 विभागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही झारखंडमधील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. तर मागील वर्षीच्या दुष्काळग्रस्तांना तात्काळ 3500 रुपयांची मदत देण्यात यावी, असे निर्देशही मदत व पुनर्वसन विभागाला या बैठकीत देण्यात आले आहे.
आणखी 14 लाख शेतकऱ्यांना फायदा
झारखंडमध्ये मागील वर्षीही भीषण दुष्काळाची परिस्थिती होती. त्यामुळे झारखंड सरकारने मागील वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधी योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यास 3500 रुपये तरतुद करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील जवळपास 28 लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मागील वर्षी अर्ज केले होते. मात्र त्यातील केवळ 12 लाख शेतकऱ्यांना ही 3500 रुपये (प्रति शेतकरी) मदत मागील वर्षी देण्यात आला होती. मात्र आता मागील वर्षीच्या आणखी १४ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 3500 रुपये देण्याचे आदेश झारखंड सरकारकडून मदत आणि पुनर्वसन विभागाला देण्यात आले आहे. तसेच यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा घेत, जवळपास 17 जिल्ह्यांमधील 158 विभागांमध्ये यावर्षी नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.