Drought : दुष्काळ निवारणासाठी पुढे या…; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. महाराष्ट्र दुष्काळ (Drought) निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळ निवारण अंमलबजावणीबाबत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

यावेळी महाराष्ट्र दुष्काळ (Drought) निवारण आणि मदत कार्यक्रम समितीचे (एमडीआरएसपी) शिरीष कुलकर्णी व स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक, गौतम गालफाडे, झेलम जोशी, राज्यातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलातील कमतरता आदी निकष लक्षात घेऊन 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यात गंभीर तर 16 तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात कमी पाऊस, सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी म्हटले आहे.

जॉब कार्ड देण्याची गरज (Drought In Maharashtra)

दुष्काळात पिण्याचे पाणी, चारा टंचाई, बेरोजगारी इत्यादी परिस्थितीला सामोरे जावे लागते. बेरोजगारीमुळे वंचित घटक, आदिवासी, शेतमजूर आदी घटकातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. याची सर्वाधिक झळ महिला, जेष्ठ व्यक्ती, मुलांना बसते. त्यांचे स्थलांतर रोखून त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळवून देणे, त्यासाठी त्यांना जॉब कार्ड मिळवून देणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या आहे.

समन्वयाने काम करावे

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर होतो का? आदींची माहिती संस्थांनी निर्दशनास आणावी. दुष्काळ निवारणाच्या कामात स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय ठेवून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांपर्यंत सरकारच्या विविध योजना पोहचविण्यात याव्यात. संस्थांनी सक्षम होऊन चांगल्या प्रकारे सर्वेक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

error: Content is protected !!