E-Samridhi Portal : अशी करा नाफेडकडे ऑनलाईन तूर विक्रीसाठी नोंदणी; फॉलो करा ‘या’ स्टेप्स!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (E-Samridhi Portal) अर्थात ‘नाफेड’कडून ऑनलाईन तूर खरेदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विक्रीसाठी इकडे-तिकडे भटकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून किंवा डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची तूर नाफेडला विक्री करण्यासाठी नोंदणी करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही. हमीभावाने ही तूर खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे आज आपण नाफेडला तुमची तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी (E-Samridhi Portal) कशी करायची? याबाबत जाणून घेणार आहोत.

महिनाभपूर्वी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी सरकारी तूर खरेदीची घोषणा केली होती. त्यानुसार एका ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला होता. सरकारच्या या ई-समृद्धी पोर्टलवर (E-Samridhi Portal) ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही आता तुमची तूर विक्री करू शकणार आहे. यासाठी तुम्हाला नाफेडकडे ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ही नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकतात. किंवा मग जवळच्या डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील नोंदणी करू शकतात.

अशी करा नोंदणी (E-Samridhi Portal For Farmers)

  • तुमच्या तुरीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://esamridhi.in/#/ या संकेस्थळावर जायचे आहे.
  • हे संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन आणि एजेंसी रजिस्ट्रेशन दोन ऑप्शन दिसतील.
  • तुम्ही शेतकरी असल्याने तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर फार्मर रजिस्ट्रेशन/लॉगिन बॉक्स ओपन होईल.
  • त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅप्च्या भरायचा आहे.
  • आणि संपूर्ण माहिती भरून नाफेडला तूर व्रिक्रीसाठीची नोंदणी करायची आहे.
  • तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल.

‘या’ तीन स्टेप्समध्ये होणार विक्री

१. नोंदणी

नाफेडकडे ऑनलाईन तूर विक्रीची नोंदणी करणे, खूपच सोपे आहे. ही नोंदणी प्रामुख्याने तुम्ही कॉम्पुटर किंवा मग तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून देखील करू शकतात. सरकारच्या ई-समृद्धी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला के-वाईसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये तुमची जमीन विषयक माहिती, आधारकार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती तपासली जाते.

२. खरेदी प्रक्रिया

आता तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आणि त्याच्या तुरीची माहिती ई-समृद्धी पोर्टलवर जाते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तुरीला नाफेडकडून एक युनिक नंबर जारी केला जातो. याच पोर्टलवर तुम्हाला तूर विक्री करण्यात आल्याची अपडेट देखील मिळणार आहे. तुमच्या तुरीच्या गोण्यांना क्यूआर कोड जारी केला जातो. या कोडच्या माध्यमातून नाफेडला तुमच्या तुरीची ऑनलाईन गुणवत्ता समजते.

३. तुरीचे पैसे कसे मिळणार?

तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नाफेडकडून पीएफएमएस प्रक्रियेच्या माध्यमातून अर्थात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवेद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जातात. या प्रकियेमुळे बाजारातील मध्यस्थांची संख्या कमी होणार आहे.

error: Content is protected !!