Edible Oil Import : 10 वर्षात खाद्यतेल आयात दीड पटीने वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तेलबियांचे कमी उत्पादन आणि वाढत्या खाद्यतेलाच्या मागणीचे (Edible Oil Import) गणित मागील दशकभरापासून मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. त्यातच आता मागील दहा वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत (Edible Oil Import) दीड पटीने तर खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मागील एका दशकभरात भारतातील खाद्यतेल आयातीत 50 लाख टनांची वाढ नोंदवली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, 2013-14 यावर्षी देशात एकूण 116 लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. जी 2022-23 या वर्षांमध्ये 165 लाख टन इतकी सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. प्रामुख्याने मागील दोन ते तीन वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी संपूर्ण दशकाचा विचार करता खाद्यतेल आयात दीड पटीने तर आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून नवीन खाद्यतेल वर्ष सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपलेल्या मागील खाद्यतेल वर्षाची ही आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.

सर्वात मोठा आयातदार देश (Edible Oil Import India)

त्यानुसार सद्यस्थितीत भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश बनला असल्याचे दिसून येत आहे. सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 यावर्षी 140 लाख टन खाद्यतेल बाहेरच्या देशांमधून मागवले गेले. ज्यासाठी देशाला 19.6 अब्ज डॉलर (1 लाख 56 हजार 800 कोटी रुपये) इतका खर्च आला. तर 2022-23 मध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 25 लाख टनांनी वाढ होऊन ती 165 लाख टन इतकी नोंदवली गेली. ज्यासाठी भारताला तत्कालीन दरांनुसार 16.7 अब्ज डॉलर (1 लाख 38 हजार 424 कोटी रुपये) इतका खर्च आला.

103 लाख टन उत्पादन

दरम्यान, 2022-23 या मागील खाद्यतेल वर्षात भारतात सर्व स्वदेशी स्रोतांपासून जवळपास 103 लाख टन खाद्यतेलाचे उत्पादन झाले आहे. तर याच कालावधीत बाहेरील देशांमधून 165 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले आहे. असेही या आकडेवारीत म्हटले आहे. अशी एकूण 268 लाख टन तेलाची उपलब्धता मागील खाद्यतेल वर्षात राहिली. ज्यामध्ये 38.6 टक्के देशांतर्गत उत्पादनाचा तर 61.4 टक्के बाहेरील खाद्यतेलाचा समावेश राहिला आहे. त्यामुळे एकंदर आकडेवारीचा विचार करता देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तेलबियांचे उत्पादन घेण्याची आवश्यकता दिसून येते. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

error: Content is protected !!