Edible Oil Price : देशातील खाद्यतेल दरात वाढ; सोयाबीनचे दर वधारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील खाद्यतेल बाजारात सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सूर्यफूल तेलाचे (Edible Oil Price) दर 955 ते 960 डॉलर अर्थात 79 हजार 542 ते 79 हजार 958 रुपये प्रति टन इतके होते. जे चालू आठवड्यात 1010 ते 1015 डॉलर अर्थात 84 हजार 122 ते 84 हजार 539 रुपये प्रति टनांपर्यंत वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून देशातील बाजार समित्यांमध्ये चालू आठवड्यात सोयाबीन, मोहरी आणि शेंगदाणा दरात वाढ झाली आहे. दरम्यान, सूर्यफूल तेलाव्यतिरिक्त अन्य तेलांच्या (Edible Oil Price) दरवाढीवरही याचा परिणाम पाहायला मिळाला.

प्रमुख सोयाबीन उत्पादक देश असलेल्या ब्राजील या देशांमध्ये सध्या पावसाअभावी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. त्यामुळे भारतातील खाद्यतेल आणि तेलबियांचा दरवाढीला बळ मिळाले आहे. त्यातच यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊसमान झाल्याने देशातील खरीप हंगामात भुईमूग आणि सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आयातीत खाद्यतेलांच्या किमतींवर आधीच दबाव असून, देशांतर्गत तेल गिरण्यांना खाद्यतेल निर्मितीत मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

सोयाबीन तेलाच्या दरात वाढ (Edible Oil Price Increase In India)

चालू आठवड्यात देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात प्रति क्विंटल मागे 50 ते 150 रुपयांची वाढ नोंदवली गेली. काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5425 ते 5225 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. तर सोयाबीन तेलाच्या दरातही वाढ दिसून आली. दिल्ली बाजारात सोयाबीन तेलाच्या दरात प्रति क्विंटलमागे 125 रुपये वाढ होऊन, सोयाबीन तेलाचा दर 10 हजार 525 रुपये क्विंटल इतका नोंदवला गेला. इंदोर बाजारात सोयाबीनच्या तेलाच्या दरात 25 रुपये प्रति क्विंटल इतकी अल्प वाढ नोंदवली गेली. इंदोर येथे 10 हजार 325 रुपये प्रति क्विंटल दरात सोयाबीन तेल उपलब्ध आहे.

मोहरी-शेंगदाणा तेलही वधारले

देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये मोहरीच्या दरातही प्रति क्विंटलमागे 25 रुपये वाढ पाहायला मिळाली. मोहरीला चालू आठवड्यात 5750 ते 5800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तर मोहरीच्या तेलाच्या दरात प्रति क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ होऊन, मोहरीच्या तेलाला चालू आठवड्यात 10 हजार 750 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. याशिवाय शेंगदाणा तेलातही प्रति क्विंटलमागे 80 ते 500 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. चालू आठवड्यात शेंगदाण्याला प्रति क्विंटल 6650 ते 6725 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर शेंगदाणा तेलाला (गुजरात) 15 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

पामतेलानेही खाल्ला भाव

चालू आठवड्यात कच्च्या पाम तेलाच्या दरात प्रति क्विंटलमागे 550 रुपये इतकी वाढ नोंदवली गेली. पाम तेलाला 8475 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दिल्ली पामोलिन तेलाच्या दरातही 100 रुपयांची वाढ होऊन ते 9300 रुपये प्रति क्विंटल इतके नोंदवले गेले. कांडला पामोलिन तेलाच्या दरात 50 रुपये प्रति क्विंटलची वाढ होऊन ते 8500 रुपये प्रति क्विंटल इतके नोंदवले गेले.

error: Content is protected !!