हॅलो कृषी ऑनलाईन : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दर घसरणीनंतर देशातील अंडयाचे दर (Eggs Rate) मागील 15 दिवसांपासून काहीसे स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यत्वे करून दरातील ही स्थिरता उत्तरेकडील राज्यांमध्ये असून, महाराष्ट्र आणि विशेषतः दक्षिणकडील काही भागांमध्ये मात्र अंड्याचे दर हे शेकडा 600 रुपयांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. चालू पंधरवड्यात विशेष करून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये अंड्याच्या दरात (Eggs Rate) अल्प सुधारणा नोंदवली गेली आहे.
प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (616), पुणे (615), नागपूर (570), वाराणसी (583), लखनऊ (583), पटना (570), अलाहाबाद (576), कोलकाता (602), कानपुर (552), रांची (590), अहमदाबाद (575) , चेन्नई (610), बंगळुरू (600), विजयवाडा-आंध्रप्रदेश (542), लुधियाना (520), दिल्ली (543), हैद्राबाद (554), अजमेर (537), सुरत (595), इंदोर (560), चिंतुर-तामिळनाडू (603). नोंदवले गेले आहेत.
प्रति शेकडा 10 ते 20 रुपये वाढ
अर्थात फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला देशभरातील शहरांमध्ये प्रति शेकडा अंड्याचे दर हे 600 रुपयांच्या आत होते. मात्र, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या अंड्याचे दर 600 रुपये प्रति शेकडाहून अधिक आहेत. ही दरवाढ प्रति शेकडा 10 ते 20 रुपये इतकी नोंदवली गेली आहे. त्यामुळे देशभरातील पोल्ट्री उद्योजकांसाठी हा अल्प का होईना? पण दिलासा ठरणार आहे.
राज्यातील दराला योजनेचा आधार
दरम्यान, सध्याच्या स्थितीमध्ये देशातील अनेक भागामध्ये थंडीचे प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झाले असून, त्यामुळे अंड्याची मागणी घटली आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्र सरकारकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी वाटप केले जाते. त्यामुळे राज्यातील अंड्याची मागणी कायम आहे. शालेय पोषण आहारामुळे राज्यातील अंडी दराला आधार मिळाला आहे. मात्र, राज्यात बऱ्यापैकी बाहेरील राज्यांमधून अंडी येत असल्याचे पोल्ट्री उद्योजकांकडून सांगितले जाते. त्यामुळे केवळ राज्यातील अंडी उत्पादकांकडूनच शालेय पोषण आहारातील अंडी खरेदी केली जावी. अशी मागणी या उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे.