Eggs Rate : अंडी दरात घसरण; पहा आजचे अंड्यांचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या अंडी दरात (Eggs Rate) आज काहीशी घट पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशातील अनेक शहरांमध्ये अंड्याच्या दराने 700 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला होता. मात्र आता अंडी दरात घसरण झाली असून, बिहारची राजधानी पटना आणि उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे मागील आठवड्यात असलेले प्रति शेकडा 700 रुपये अंड्याचे दर (Eggs Rate), आज अनुक्रमे 667 आणि 683 रुपयांपर्यंत खाली आले आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

मागील आठवड्याच्या सुरुवातीला असलेल्या दरांच्या तुलनेत आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दरात शेकडा 15 ते 30 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (645), पुणे (650), वाराणसी (667), लखनऊ (683), अलाहाबाद (667), कोलकाता (630), कानपुर (652), रांची (657), अहमदाबाद (633) , चेन्नई (610), बंगळुरू (610), विजयवाडा-आंध्रप्रदेश (580). अर्थात मागील आठवड्याच्या सुरुवातीला असलेले 667 ते 700 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर चालू आठवड्यात 630 ते 667 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे.

थंडीसोबतच दरातही घसरण

दुधानंतर अंड्यांमध्ये सर्वात जास्त पौष्टिक घटक असतात. प्रथिने जास्त असल्याने आणि खायला उबदार असल्याने हिवाळ्याच्या हंगामात देशातील अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. डिसेंबर महिन्यात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे मागणीत वाढ होऊन, अचानक अंड्यांच्या दरात वाढ झाली होती. मात्र आता राज्यासह देशातील काही भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले असून, या थंडीसोबतच अंड्यांचे दर देखील काहीसे कमी झालेले पाहायला मिळत आहे.

देशात अंड्यांचा वापर झपाट्याने वाढला असून, अंडी उत्पादनातही वाढ झाली आहे. भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा अंडी उत्पादक देश असून, देशातील उत्पादित झालेल्या अंड्यांची संख्या सध्या 122.05 अब्ज इतकी आहे. स्वातंत्र्यानंतर 1950-51 मध्ये देशातील अंडी उत्पादन केवळ 1.83 अब्ज इतके होते. देशातील दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही सर्वाधिक अंडी उत्पादन करणारी राज्य आहेत.

error: Content is protected !!