हॅलो कृषी ऑनलाईन: तेल उत्पादक कंपन्यांनी मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला (Ethanol From Maize) प्रति लिटर 5.79 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मका इथेनॉलला (Ethanol From Maize) मिळणारा 66.07 रुपये दर वाढून 71.86 रुपये प्रतिलिटर होणार आहे.
शुक्रवारपासून खरेदी करण्यात येणाऱ्या इथेनॉलला ही किंमत लागू होईल. इथेनॉल (Ethanol From Maize) वर्षाच्या उर्वरित कालावधीत या किमती विचारात घेतल्या जाणार आहेत. जीएसटी वगळून हे अनुदान दिले जाईल.
यंदा साखर उत्पादनात घट येईल या अंदाजामुळे केंद्र सरकारने उसाचा रस व सिरपपासून इथेनॉल तयार करण्याला मर्यादा घातली. यामुळे सरकारच्या 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयाला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. हा धोका टाळण्याकरिता तेल उत्पादक कंपन्यांनी नुकताच सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पाठोपाठ मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची (Ethanol From Maize) किंमत वाढविली आहे.
गेल्या एक-दोन वर्षांपासून साखर उद्योगाबरोबरच धान्य आधारित डिस्टलरीजची संख्याही वाढत आहे. सध्या धान्यापासून तयार होणाऱ्या 292 कोटी लिटर इथेनॉलला (Ethanol From Maize) मागणी आहे. शासनाने सहकार्य केल्यास 500 कोटी लिटरपर्यंत इथेनॉल तयार होऊ शकते, असा अंदाज ऑल इंडिया डिस्टिलरीज असोसिएशनचा आहे.
देशात कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांमध्ये मक्याचे अधिक उत्पादन घेतले जात आहे. अनेक राज्यांमध्ये मक्यावर आधारित इथेनॉल (Ethanol From Maize) प्रकल्प उभे राहत आहेत.
साखर उद्योगातूनही खरेदी किंमत वाढीची मागणी
तेल उत्पादक कंपन्यांच्या निर्णयानंतर आता साखर उद्योगानेही बी हेवी मोलॅसिस, उसाचा रस, सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी किंमत वाढविण्याची मागणी केली आहे.
केंद्राने बी हेवी मोलॅसिस, उसाचा रस, सिरपपासून मर्यादित प्रमाणात इथेनॉल तयार करण्यास परवानगी दिली आहे. या घटकांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची दरवाढ केल्यास त्याचा काहीसा लाभ इथेनॉल प्रकल्पांना होऊ शकेल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.