Ethanol Subsidy : इथेनॉल निर्मितीसाठी अनुदान; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने ‘सी हेवी मोलॅसिस’पासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर 6 रुपये 87 पैसे अनुदान (Ethanol Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता सी हेवी इथेनॉलला प्रतिलिटर 49 रुपये 41 पैशांऐवजी 56 रुपये 28 पैसे इतका दर मिळणार आहे. अर्थात इथेनॉल दरात केंद्र सरकारकडून 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांना व पर्यायाने शेतकऱ्यांना उसाला एफआरपी (Ethanol Subsidy) मिळण्यासाठी मदत होणार आहे.

चालू वर्षीच्या खरीप हंगामातील अपुर्‍या पावसामुळे यावर्षी उसाचे गाळप कमी असणार आहे. परिणामी देशात आवश्यक तितकी साखर उत्पादित होणार की नाही? याबाबत केंद्र सरकारला साशंकता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसिस आणि सिरपपासून इथेनॉल (Ethanol Subsidy) निर्मिती करण्यास कारखान्यांना बंदी घातली होती. या निर्णयास साखर उद्योगासह शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध केला. परिणामी केंद्र सरकारला हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून इथेनॉलच्या प्रोत्साहन अनुदान दरात वाढ करण्यात आली आहे. हे अनुदान तेल कंपन्यांना 2023-24 मध्ये पुरवठा केलेल्या इथेनॉलवर मिळणार आहे.

मोलॅसिस निर्यातीस पायबंद (Ethanol Subsidy By Central Government)

परिणामी मोलॅसिसच्या निर्यातीस पायबंद घातला जाणार आहे. याशिवाय सध्या सी हेवी मोलॅसिसचा दर 12 हजार रुपये प्रति टन इतका आहे. इतका दर असूनही देशातून मोठ्या प्रमाणात सी हेवी मोलॅसिस निर्यात केली जाते. मात्र आता या निर्णयामुळे ही निर्यात कमी होणार असून, देशातंर्गत इथेनॉल निर्मितीला चालना मिळणार आहे. दरम्यान, मोलॅसिस निर्यातीवर 50 टक्के निर्यात कर लागू करण्याबाबत सरकारी पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.

‘बी’ हेवी, सिरप दर स्थिर

केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ केली आहे. मात्र बी हेवी मोलॅसिस आणि सिरपच्या दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने केवळ साखरेच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास अटकाव घातल्याचे दिसून येत आहे. देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता 1380 कोटी लिटर इतकी आहे. यातील 875 कोटी लिटर इथेनॉल मोलॅसिसवर आधारित तर 505 कोटी लिटर हे धान्यापासून तयार केले जाते. केंद्र सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे निर्धारित केले आहे. त्यासाठी देशात 1016 कोटी लिटर इथेनॉलची गरज असणार आहे. सध्या 1380 कोटी लिटर देशात इथेनॉल निर्मिती होत आहे.

error: Content is protected !!