Ethenol Pump : इथेनॉलआधारित पंप लवकरच सुरू होणार – गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर लवकरच इथेनॉलआधारित पंप (Ethenol Pump) सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मुले पेट्रोल-डिझेल नाही तर इथेनॉलआधारित (Ethenol Pump) दुचाकी, ऑटो रिक्षा, आणि चार चाकी चालवतील.” असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ या कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चालना मिळण्यासाठी अनेक नामांकित कंपन्या इथेनॉल आधारित वाहनांची निर्मिती करत आहे. लवकरच आपल्या हातात इथेनॉलआधारित दुचाकी, चारचाकी असतील. महिंद्रा या नामांकित ट्रॅक्टर कंपनीने तर यावर्षीच्या ऍग्रो व्हिजन कार्यक्रमात आपला सीएनजी आधारित ट्रॅक्टर प्रदर्शनास ठेवला आहे. त्यामुळे आता याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचेही नितीन गडकरी यावेळी म्हटले आहे.

बांबू उत्पादकांना फायदा होणार (Ethenol Production In India)

आसाममधील नुमालिगढ येथील पाईपलाईनने बांग्लादेशला पेट्रोल आणि डिझेल पाठवले जाते. भविष्यात या पाईपलाईनने इथेनॉल मिश्रित पेट्रोल-डिझेल पाठवण्याची सरकारची योजना आहे. यामुळे केवळ स्वस्त इंधन आणि प्रदूषणच नाही रोखले जाणार तर देशातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे बायो-इथेनॉल बनवण्यासाठी लागणाऱ्या बांबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. असेही गडकरी यावेळी म्हणाले. याशिवाय ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा लागतो. या कोळशाऐवजी बांबूचे छोटे-छोटे करून ऊर्जा निर्मिती करण्याची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले.

संत्रा युनिट स्थापन होणार

“आपल्या देशात कापूस स्वस्त कपडे महाग आहे. संत्री स्वस्त संत्र्याचा ज्यूस महाग आहे. बटाटा स्वस्त चिप्स महाग आहे. देशाला मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही.” अशी खंतही गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली. मात्र आता विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच नागपूर येथे एका मोठ्या संत्रा युनिटची स्थापना केली जाणार आहे. पतंजलीकडून येत्या दोन ते तीन महिन्यात हा संत्रा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. त्यामुळे नागपूर आणि आसपासच्या संत्री उत्पादक जिल्ह्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली आहे.

error: Content is protected !!