Farmer Success Story: पपईच्या एका झाडाला तब्बल 200 हून अधिक पपया; भोर तालुक्यातील शेतकऱ्याचा रेकॉर्ड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भोर तालुक्यातील वेळू येथील प्रयोगशील शेतकरी (Farmer Success Story) गुलाब महादेव घुले यांनी पपईच्या शेतीत जीवामृताचा वापर करून पपईच्या एका झाडावर तब्बल 205 हून अधिक पपयांचे उत्पादन (Farmer Success Story) घेतले आहे.

घुले यांनी साई हायटेक नर्सरी, सिंगापूर (ता. पुरंदर) येथून  पपईची 35 रोपे आणली होती. बांधावर अर्धा फुटाचा खड्डा घेऊन कुजलेला पालापाचोळा, शेणखत आणि माती याचे मिश्रण करून खड्डे भरून घेतले. जुलै 2022 मध्ये लागण करताना पपईची रोपे जीवामृतामध्ये बुडवून खड्ड्यात लागवड केली यामुळे किडी आणि रोगांपासून पपई रोपांचे संरक्षण झाले.

सहा महिन्यांत पपईला फुले आल्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पहिल्या तीन महिन्यांत आठवड्यातून एकदा अर्धा लीटर जीवामृतचा पपईच्या झाडांना डोस दिला. सहा महिने ते एक वर्ष यामध्ये महिन्यातून चारवेळा दोन लीटर जीवामृत (Jivamrut) दिले. तसेच चार दिवसांतून एकदा पाणी दिले.

खोडापाशी सुकलेला पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, भाताचा कोंडा, काड, पालापाचोळा, गुरांचे उष्टावळ, वाळलेले निकृष्ट गवत वापरून जमिनीवर आच्छादन केले यामुळे  जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले, व जमिनीत पाणी आणि ओलावा टिकून राहिला.

आच्छादनामुळे तण नियंत्रण करणे सोपे झाले, तसेच गांडुळाची संख्या वाढून जमीन भुसभुशीत राहण्यास मदत झाली. पाण्याचा योग्य निचरा झाला.

छाटणीने फांद्या व पपईच्या फळांच्या संख्येत वाढ होते. साधारणपणे दोन महिन्यांत पपईची दोन फुटांपर्यंत वाढ झाल्यावर पपईची छाटणी सकाळी करून घेतली. छाटणी केलेल्या शेंड्यावर देशी गाईच्या शेणाचा लेप दिला. त्यानंतर 15 दिवसांनी सरासरी पाच ते सात फांद्या आल्या. झाडाच्या फांद्यांची संख्या वाढल्याने पपईचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत (Farmer Success Story) झाली.

परागीभवनामुळे शेतातील उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाऱ्याची दिशा असल्याने पपईच्या झाडांची लागवड पश्चिमेकडील बांधावर केली आहे. जेणेकरून पूर्वेकडील फळबाग, फळभाज्या यांच्या परागीकरणास मदत होऊन फळनिर्मिती जास्त होण्यास मदत होईल.

शेतावर दोन देशी गाईंच्या सहाय्याने तीन एकर क्षेत्र पिकवत आहेत. देशी गायीपासून गोमूत्र व शेण मिळते. याचा वापर जीवामृत तयार करताना होतो. 200 लीटर पाणी, 10 किलो देशी गायीचे शेण, 5 लीटर देशी गायीचे गोमूत्र, 1 किलो गूळ, 1 किलो बेसन, मूठभर बांधावरची जिवाणूयुक्त माती हे मिश्रण काठीने मिसळून दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळले. ड्रमच्या तोंडावर गोणपाट झाकून ते 48 तासांकरिता सावलीत ठेवले. महिन्यातून दोन वेळा पाच लीटर प्रति झाड असे दिले.

अशाप्रकारे घुले यांनी जास्तीत जास्त जीवामृत वापरून विषमुक्त पपईचे उत्पादन घेतले. यामुळे पपईला 60 रुपये किलोने बाजारभाव मिळाला. पपईची विक्री थेट बांधावर झाली तसेच  ऑनलाइन सुद्धा या पपईला प्रचंड मागणी होती (Farmer Success Story).

error: Content is protected !!