हॅलो कृषी ऑनलाईन : नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील एक एकर शेती असलेल्या शेतकरी (Farmers Help) रामचंद्र गव्हाणे यांची बैलजोडी दोन वेळा चोरीला गेली. पोलिसांनी त्यांची साधी तक्रार लिहून घेतली नाही. त्यामुळे बैल जोडी दोनदा चोरीला गेल्याने रामचंद्र गव्हाणे पूर्णतः खचून गेले होते. मात्र, एका शेतकरी नेत्याच्या माध्यमातून याबाबतची माहिती फेसबुक, व्हॉट्सॲपवर पसरताच, अनेकांनी मदतीचा हात देऊन केवळ दोनच दिवसात त्यांना 80 हजाराची नवीन बैलजोडी घेऊन दिली आहे. होय… सामान्य सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या शेतकऱ्याला मदतीचा (Farmers Help) दिला हात दिला असून, त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
पोलिसांच्या तक्रार लिहिण्यास नकार (Farmers Help In Nanded)
शेतकरी रामचंद्र गव्हाणे हे अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथील रहिवासी आहे. त्यांची एक एकर शेती असून, त्यांच्याकडे आपल्या शेतीसाठी एक बैलजोडी होती. मात्र, त्यांची ही बैलजोडी प्रथमतः चोरीला गेली. त्यानंतर त्यांनी कशीबशी मोलमजुरी करून दुसरी बैलजोडी घेतली. मात्र काही दिवसांपूर्वी तीही चोरीला गेली. एका शेतकऱ्यांसाठी आपली सर्जा-राज्याची बैलजोडी जीव की प्राण असते. हे वेगळे सांगायला नको. काहींना ऑडी आणि मर्सीडीज या महागड्या गाड्यांच्या काळात बैलजोडी ही शुल्लक गोष्ट वाटेल. परंतु, शेतकऱ्यांसाठी हीच बैलजोडी त्यांचे सर्व काही असते. अशातच रामचंद्र गव्हाणे यांची दोन वेळा बैलजोडी चोरीला गेल्याने, ते हताश झाले होते. पोलिसांनी देखील त्यांची तक्रार लिहून घेण्यास नकार दिला.
दोनच दिवसात 80 हजार रुपये जमा
एका स्थानिक शेतकरी नेत्याला या घटनेबाबत माहिती मिळताच, त्याने हा रामचंद्र गव्हाणे यांच्यासोबत घडलेला बैल जोडी दोन वेळा चोरीला जाण्याचा प्रकार फेसबुक, व्हॉट्सॲपवर शेअर केला. आणि त्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याला मदत (Farmers Help) करण्याचे आवाहन केले. ही एकच पोस्ट आणि शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांच्या एक एकरावर गुजराण करणाऱ्या कुटुंबाला जगण्याची नवी उमेद मिळावी. फेसबुक वापरकर्त्यांनी केवळ दोनच दिवसात शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांच्या कुटुंबाला ८० हजाराची नवीन बैलजोडी घेऊन दिली आहे. काही तासातच अनेकांनी रामचंद्र गव्हाणे यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांना नवीन बैलजोडी मिळाल्याने खूप मोठा आधार निर्माण झाला असून, या संकटातून सावरण्यास मोठी मदत झाली आहे.