हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ (Farmers Loan) करण्यात यावे. या मागणीसाठी राजधानी दिल्ली येथे शेतकरी लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहेत. अशातच आता हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकलपात आपल्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यंमत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील सर्व व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जावरील (Farmers Loan) दंडाची रक्कम देखील सरकारकडून भरली जाणार असल्याचे त्यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.
महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये कर्ज (Farmers Loan
Interest Waiver)
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) आकडेवारीनुसार, सध्यस्थितीत पंजाबमधील शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्ज (Farmers Loan) आहे. तेथे प्रति शेतकरी 2.95 लाख रुपये इतके आहे. तर महाराष्ट्रात देखील खातेधारक शेतकऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक असून, महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये इतके कर्ज आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची एकूण कर्जाची रक्कम 1 लाख 61 हजार 471 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र सरकार देखील आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जाबाबत काहीतरी दिलासा द्यावा. अशी आशा राज्यभरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
साडेपाच लाख शेतकऱ्यांना फायदा
दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शुक्रवारी (ता.24) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ही व्याजमाफीची घोषणा केली असून, याचा हरियाणातील जवळपास 5 लाख 47 हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी म्हटले आहे की, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा असून, मला शेतकऱ्यांचे दुःख माहिती आहे. मी देखील शेतीमध्ये नांगर हाकला आहे. त्यामुळे यावेळेच्या अर्थसंकलपात शेतकऱ्यासांठी भरीव तरतुद केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
29,876 कोटींची खरेदी
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे की, हरियाणामध्ये 2023-24 यावर्षी कृषी उत्पादनात 8.1 टक्के वाढ झाली आहे. जी देशभरातील सर्वाधिक आहे. याशिवाय मागील तीन वर्षात सरकारने किमान आधारभूत किमतीने अर्थात हमीभावाने 14 पिकांची खरेदी केलेली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. चालू वर्षीच्या 2023 च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी 29,876 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली आहे.