Farmers Protest : दुर्दैवी! आंदोलनात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू; सीमेवर तणावपूर्ण वातावरण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंजाब आणि हरियाणातील शेतकरी (Farmers Protest) मोठ्या जिकरीने नवी दिल्ली येथे हमीभाव कायद्यासाठी लढा देत आहेत. अशातच गुरुवारी (ता.23) रात्री या आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या अगदी एक दिवस आधी भटिंडा जिल्ह्यातील शुभकरण सिंग नावाच्या एका तरुण शेतकऱ्याचा खनौरी सीमेवर आंदोलनदरम्यान मृत्यू झाला होता. तर आज दर्शन सिंह नावाच्या आणखी एका शेतकऱ्याने आपले प्राण गमावले आहे. याआधीही आंदोलनात दोन शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आता नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) मृत शेतकऱ्यांची संख्या 5 वर पोहचली आहे.

पंजाब सरकारकडून 1 कोटीची मदत (Farmers Protest In New Delhi)

दरम्यान, शुभकरण नावाच्या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूबाबत कोणतीही स्पष्टता समोर येऊ शकली नाही. हरियाणा पोलिसांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर ट्विट करत बुधवारी शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) कोणत्याही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते. मात्र, पंजाब सरकारकडून खनौरी सीमेवर आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शुभकरण सिंग या तरुणाच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. स्वतः पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमांवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्यामुळे शुभकरण सिंग या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी शेतकरी संघटनांनी आज ‘काळा दिवस’ पाळत दिवसभर आंदोलन स्थगित केले होते.

मृत शेतकऱ्यावर आठ लाखांचे कर्ज

दरम्यान, आज मृत्यू पावलेले अन्य एक शेतकरी दर्शन सिंह हे जवळपास 60 वर्षांचे होते. हरियाणा पोलिसांनी खनौरी सीमेवर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अश्रूधुराचा वापर केल्याने या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. वेळीच त्यांना पतियाळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतकेच नाही तर मृत्यू झालेल्या या दर्शन सिंग शेतकऱ्याच्या नावावर शेतीचे आठ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मृत शेतकऱ्याच्या परिवाराला सरकारकडून मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!