Farmers Protest : शेतकरी आंदोलनात खाप पंचायतींची ‘एंट्री’; सरकारच्या अडचणीत वाढ होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायदा आणि आपल्या विविध 11 मागण्यांसाठी (Farmers Protest) पंजाब व हरियाणातील शेतकरी गेल्या 13 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहे. मात्र, या आंदोलनदरम्यान पहिल्यांदाच हरियाणातील खाप पंचायत समोर आली आहे. खाप पंचायतीने आंदोलनादरम्यान विभागलेल्या शेतकरी संघटनांना आणि त्यांच्या मागण्या मान्य न करणाऱ्या शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. हरियाणातील रोहतक या ठिकाणी खाप पंचायतीने बैठक घेतली आहे. या बैठकीत खाप पंचायतीने शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत एकजूट होण्यास सांगितले आहे. तर केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काहीतरी तोडगा काढावा. अन्यथा आपण आपल्या पद्धतीने आंदोलन (Farmers Protest) उभारू, असेही हरियाणातील खाप पंचायतीने म्हटले आहे.

आंदोलनात उतरण्याचा इशारा (Farmers Protest In Delhi)

15 मार्चपर्यंत शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) काहीतरी तोडगा न निघाल्यास, 2021 प्रमाणे हरियाणातील खाप पंचायती सत्ताधारी भाजप आणि जेजेपी (जननायक जनता पार्टी) यांच्याविरोधात जात शेतकरी आंदोलनात उतरेल. असेही खाप पंचायतींनी स्पष्ट केले आहे. हरियाणातील शेतकऱ्यांमध्ये रोष यामुळे आहे की हरियाणातील भाजप-जेजेपी सरकार शेतकऱ्यांना नवी दिल्लीतील आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखत आहे. इतकेच नाही 2021 मध्येही शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी देखील हरियाणातील खट्टर सरकारने रस्ते खोदले. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे फवारण्यात आले होते. शेतकऱ्यांचे मार्ग अडवले होते. यावेळी देखील आंदोलन सुरु होण्याच्या आधीपासून सरकारने शेतकऱ्यांशी पंगा घेतला. सरकार शेतकऱ्यांना ना ट्रॅक्टर आणि ना पायी दिल्लीला जाऊ देत आहे. असेही खाप पंचायतीने म्हटले आहे.

सरकारच्या अडचणीत वाढ होणार

शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हरियाणामध्ये देखील ठीकठिकाणी आंदोलन केले जात आहे. ज्यामध्ये रोहतक या ठिकाणी खाप पंचायती एकत्र आल्या आहे. मात्र, सत्ताधारी पार्टीकडून दावा केला जात आहे की आंदोलन केवळ पंजाबमधील शेतकरी करत आहे. मात्र आता शेतकरी आंदोलनाबाबत खाप पंचायती समोर आल्याने, आंदोलक शेतकऱ्यांना देखील हुरूप मिळणार आहे. अर्थात आता 2021 मधील कृषी कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान देखील खाप पंचायती शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरल्या होता. आता पुन्हा एकदा खाप पंचायतींनी रोहतक या ठिकाणी बैठक घेत, सरकारला इशारा दिल्याने यावेळी देखील हरियाणातील खाप पंचायती मागे राहणार नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

error: Content is protected !!