Farmers Protest : केंद्र सरकार-शेतकरी यांच्यातील चौथी बैठक सकारात्मक; पहा काय तोडगा निघाला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव (Farmers Protest ) मिळावा. यासाठी देशभरात कायदा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आठवडाभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी आंदोलनाचा सातवा दिवस असून, रविवारी (ता.18) रात्री उशिरा केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी संघटना यांच्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चौथी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने आणखी चार पिकांना हमीभावाच्या कक्षेत आणण्यास होकार दिला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी याबाबत विचार करण्यास वेळ मागितला असून, सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांसोबत विचारविनिमय करून (Farmers Protest ) आपला निर्णय कळवला जाईल. असे संघटनांनी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना सांगितले आहे.

चौथी बैठक सकारात्मक (Farmers Protest Fourth Meeting Positive)

दरम्यान, यापूर्वी 8, 12 आणि 15 फेब्रुवारी रोजी तीन बैठका झाल्या होत्या. मात्र या बैठकांमध्ये कोणताही ठोस तोडगा निघालेला नव्हता. रविवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये सरकारचे मंत्री आणि शेतकरी संघटना यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, गहू आणि धान या पिकांप्रमाणेच मसूर, उडीद, मका आणि कापूस या पिकांना देखील हमीभाव देण्याबाबत चर्चा झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि भारतीय कापूस महामंडळासोबत (सीसीआय) करार करावा लागेल. असे केंद्र सरकारकडून बैठकीत सांगण्यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय हे उपस्थित होते.

सरकारकडून 10 मागण्या मान्य

दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या (Farmers Protest) प्रमुख 13 मागण्या असून, त्यामधील 10 मागण्या आतापर्यंत सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. तर हमीभाव कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 60 वर्षांवरील देशातील सर्व शेतकऱ्यांना 10 हजार रुपये पेन्शन द्यावी. या तीन मागण्यांबाबत सरकारने बोलण्यास नकारघंटा दाखवली आहे. ज्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारच्या 10 मागण्या मान्य असल्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ मागितला आहे. सर्व शेतकरी संघटना आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्याशी चर्चा करून, आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. असे शेतकरी संघटनांनी रविवारी रात्री झालेल्या चौथ्या बैठकीनंतर म्हटले आहे.

आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकरी आंदोलनादरम्यान, शुक्रवारी (ता.16) एका 63 वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता रविवारी (ता.18) आणखी एका शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय आंदोलनादरम्यान आतापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. सरकारच्या आदेशानुसार पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांडे फोडले जात असल्याने तब्ब्येत खराब होऊन शेतकऱ्यांना हार्ट अटॅक येण्याचा घटना समोर येत असल्याचे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!