हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी सरकारविरोधात आक्रमक (Farmers Survey) होत रस्त्यावर उतरले आहेत. हे शेतकरी राजधानी दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र केंद्र सरकारने विविध बाबींचा अवलंब करत शेतकऱ्यांना रोखून धरले आहे. अशा स्थितीत आता प्रश्न निर्माण होतोय की, केंद्रातील मोदी सरकारवर देशातील शेतकरी नेमके किती समाधानी आहेत? २०१४ नंतर मोदी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली का? शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली का? शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा प्रभावी लाभ मिळतोय का? याबाबतचा एक मोठा सर्व्हे (Farmers Survey) समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया… नेमका हा सर्व्हे काय सांगतो.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली का? (Farmers Survey In India)
देशातील नामांकित वृत्त समूह असलेल्या ‘इंडिया टुडे’कडून ‘मूड ऑफ द नेशन’ या नावाने हा सर्व्हे (Farmers Survey) करण्यात आला आहे. यात देशातील शेतकरी सरकारच्या कामगिरीवर खुश आहेत का? याबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमका हा सर्व्हे काय सांगतो. या सर्व्हेमध्ये ३३.४ टक्के शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे स्वतः ची जमीन आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०१४ नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. 30 टक्के शेतकरी म्हणतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तर 32.5 टक्के शेतकरी म्हणतात, त्यांच्या आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा खराब झाली आहे. त्यामुळे स्थिती सुधारली असल्याचे म्हणणारे शेतकरी किंचितच अधिक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बाब मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते.
उत्पादन खर्चात झाली वाढ
इतकेच नाही तर या सर्व्हेमध्ये शेतकऱ्यांच्या खर्चात गेल्या दहा वर्षात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. देशातील 63.2 टक्के शेतकऱ्यांनी म्हटले आहे की मोदी सरकार आल्यानंतर त्यांच्या शेतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या योजनांबाबत 56 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्याला सरकारी योजनांचा लाभ झाल्याचे म्हटले आहे. तर 10.5 टक्के शेतकऱ्यांनी म्हटले आहे केंद्र सरकारच्या योजनांमुळे शेतकरी नाही तर छोट्या व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे.
शेतमजुरांची आर्थिक स्थिती सुधारली का?
देशातील असे काही शेतकरी आहे ज्यांच्याकडे शेतीच नाही. मात्र ते शेतीमजुरीवर करतात. या सर्व्हेनुसार एक तृतीयांश शेतमजुरांचे म्हणणे आहे की, २०१४ नंतर केंद्रातील मोदी सरकार आल्यानंतर त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 22 टक्के शेतमजूर म्हणतात, त्यांची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा खराब झाली आहे. तर 28.6 टक्के शेतमजूर म्हणतात, मोदी सरकार आल्यानंतर त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे.