महावितरणला कंटाळून शेतकऱ्याने 400 संत्रा झाडांवर चालवली कुऱ्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सध्या वीज कपातीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणच्या वीज कपातीला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या तब्बल ४०० संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याची घटना समोर आली आहे. शेतात विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हा शेतकरी वारंवार तक्रार करीत होता. मात्र महावितरण कडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेरीस शेतकऱ्याने हे पाऊल उचलले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जवळापूर येथील शेतकरी गणराज कडू असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्यांना त्यांच्या संत्रा बागेला पाणी देणे मुश्किल झाले होते. आधीच या भागातील संत्रा उत्पादक फळगळीमुळे त्रस्त असताना अशात फळबाग वाचवण्यासाठी शेतकरी धडपडतो आहे. शिवाय कडू यांनी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता सादर विभागाकडे अनेकदा तक्रारही केली होती. मात्र काहीच निकाल लागत नसल्यामुळे अखेर त्यांनी मोठ्या मेहनतीने जागवलेल्या संत्र्याच्या ४०० झाडांवर कुऱ्हाड चालवली.

ही कुऱ्हाड झाडावर नाही तर माझ्यावर

याबाबत बोलताना कडू म्हणाले, मी वेळोवेळी महावितरणकडे वीज पुरवठ्याबाबत तक्रारी दिल्या होत्या. मात्र, माझ्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. वीज नसल्यामुळं संत्रा बागेसह हरभरा आणि कांदा पिकाला पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. ही कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर पडत असल्याची भावनाही यावेळी गणराज कडू यांनी व्यक्त केली. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण आहे. म्हणून शासनानं महावितरणवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील गणराज कडू यांनी केली.

error: Content is protected !!