हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली या भागात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र या भागातील पूर व्यवस्थापन (Flood Management) करून पावसाळ्यातील हे पाणी दुष्काळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वळवले जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पाला जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता 3300 कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Flood Management) यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.
12 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक बँकेच्या पथकाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची (Flood Management) पाहणी केली होती. पाहणीनंतर या पथकाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. त्याच सुमारास हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक 280 मिलियन डॉलर्स (सुमारे 2328 कोटी रुपये), तर राज्य सरकार सुमारे 120 मिलियन डॉलर्स (सुमारे 998 कोटी रुपये) असा एकूण 400 मिलियन डॉलर्स (3300 कोटींचा) निधी उपलब्ध करून देणार आहे.
दुष्काळी भागांना लाभ होणार (Flood Management In Maharashtra)
महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ, तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठिशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव असतो. अशा वेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो. यासाठी पूर व्यवस्थापन करून दुष्काळी भागांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र वातावरण पूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
दुष्काळी भागांत पाणी वळवणार
या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. नीती आयोगाने सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता. एकिकृत जल व्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे सुद्धा यातून शक्य होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.