Fodder Shortage : ‘या’ राज्यात भीषण चारा टंचाई; कमी दरात चारा द्यावा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या महाराष्ट्रालातील अनेक जिल्ह्यांना जनावरांच्या चारा टंचाईला (Fodder Shortage) सामोरे जावे लागत आहे. अकोला, परभणी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर जिल्ह्यातून अन्य ठिकाणी चारा वाहतुक करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. अशातच आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू या राज्याच्या काही भागांमध्येही भीषण चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, तेथील शेतकऱ्यांनी तामिळनाडू सरकारकडे कमी अर्थात माफक दरात जनावरांना कोरडा चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

दोन्ही हंगामात अधिक पाऊस (Fodder Shortage In Tamilnadu)

विशेष म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये सध्या महाराष्ट्राप्रमाणे दुष्काळी परिस्थिती नाही. मात्र, गेल्या वर्षभरापासून पावसाने रौद्ररूप धारण केले होते. ज्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके घेण्यात अडचण येऊन, कोरड्या चाऱ्याच्या उत्पादनावर थेट परिणाम झाला. 2023 यावर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामात पुरेशा पाऊस नसताना, तामिळनाडूमध्ये यंदाच्या पावसाळी हंगामात तुलनेने अधिक पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्यातही ऐन रब्बी हंगामात तामिळनाडूमधील शेतकऱ्यांना, मिचोंग चक्रीवादळामुळे पुराचा फटका बसला. ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात मका, धान, बाजरी अशी पिके घेता आली नाही. तर काही भागांमध्ये ही पिके पुराच्या पाण्याखाली गेली. ज्यामुळे सध्या त्या ठिकाणी कोरड्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

चारा पिकांना फटका

अर्थात महाराष्ट्राला यंदा कमी पावसाचा फटका तर तामिळनाडू या राज्याला दोन्ही हंगामात अति पावसाचा फटका बसला. उन्हाळयात प्रामुख्याने सर्वच भागांमध्ये चारा टंचाई (Fodder Shortage) जाणवते. मात्र, ऐन पावसाळ्यात मका, बाजरी, धान यांसारखी चारा पिके व्यवस्थित घेता आली नाही. तर उन्हाळ्यातील चारा टंचाईमध्ये आणखीनच वाढ होते. असाच काहीसा प्रकार सध्या तामिळनाडूमधील काही जिल्ह्यांमध्ये अनुभवायला मिळत आहे.

कमी दरात चारा देण्याची मागणी

शेतकरी असलेले व एका संघटनेचे अध्यक्ष एस.ए. चिन्नासामी यांनी याबाबत म्हटले आहे की, यंदा पावसाळी हंगामात शेतकऱ्यांना मका, धान, बाजरी यांसारखी पिके घेण्यात अडचण आली. तर मिचोंग चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगाम प्रभावित झाला. ज्यामुळे सध्या अनेक जिल्ह्यामध्ये चारा टंचाईचा (Fodder Shortage) सामना करावा लागत आहे. सध्या राज्यातील हिरव्या चाऱ्याचा दर 220 रुपये प्रति 30 किलोपर्यंत पोहचला आहे. जो सहा महिन्यापूर्वी 150 रुपयांच्या आत होता. त्यामुळे आता शेतकरी चारा खरेदी तरी किती करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही तर उन्हाळ्याची सुरुवात आहे. जसे जसे दिवस जातील तसे तसे हिरव्या चाऱ्याचे दर पुन्हा वाढतील. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कमी दरात चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून सरकारकडे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!