हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) दिवसागणिक तीव्र होताना दिसत आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला. याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, जनावरांच्या देखील चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये चाऱ्याची टंचाई जाणवत असून, खबरदारीचा उपाय म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील उत्पादित चारा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये नेण्यास प्रतिबंध घालण्याचा आदेश जारी केला आहे. ज्यामुळे आता, या आदेशामुळे अकोला जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास (Fodder Shortage) पूर्णतः प्रतिबंध असणार आहे.
दोन महिन्यासाठी असेल आदेश (Fodder Shortage In Akola District)
पुढील दोन महिन्यांसाठी हा आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. ज्यामुळे अकोला जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच 15 दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी देखील परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा जनावरांचा चारा (Fodder Shortage) इतर जिल्ह्यात वाहतूक करून नेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे आता चाऱ्याची भीषण टंचाई अधोरेखित होत आहे.
दूध उत्पादक दुष्ट्रचक्रात
दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीतील पिकांप्रमाणेच, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील चाऱ्याच्या तुटवड्यामुळे मोठा फटका बसला आहे. दुधाळ जनावरे अधिक, त्यांना चारा कमी आणि दुधाचा भावही कमी अशा दुष्ट्रचक्रात दूध उत्पादक सापडले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागील महिनाभरापासून चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. ज्यामुळे राज्यातील अनेक भागात दूध उत्पादक शेतकरी आसपासच्या भागातून चारा वाहतूक करताना दिसून येत आहे. अशातच चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. अशातच कमी भावामुळे दूध व्यवसायातून फायदा कमी आणि हेळसांडच अधिक होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राज्य सरकारने यावर्षी राज्यातील 40 तालुक्यांसह 1021 मंडळांमध्ये आणि नव्याने स्थापित 224 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. परिणामी, भविष्यात जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण होऊ नये. यासाठी हा आदेश जारी करण्यात आल्याचे अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.