Fodder Shortage : दुष्काळाच्या झळा… राज्यात आतापर्यंत पाच जिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) तीव्र होताना दिसत आहे. ज्यामुळे सध्या अनेक भागांत पाणीटंचाई सोबतच जनावरांच्या चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात चारा टंचाई असणे हे काही नवीन नाही. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादित चारा, जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास बंदी (Fodder Shortage) घालण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश जारी केले आहेत.

जुलै 2024 पर्यंत चारा वाहतूक बंदी (Fodder Shortage In Maharashtra)

परिणामी, आता सोलापूर जिल्ह्यातून आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा खरेदी-विक्री (Fodder Shortage) करता येणार नाही. राज्य सरकारने आतापर्यंत 40 तालुक्यासह 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला सोलापूर जिल्ह्यात 12 लाख 41 हजार 58 जनावरे असून, या सर्व जनावरांना जिल्ह्यातील उपलब्ध चारा पुढील तीन महिने पुरेल इतका शिल्लक आहे. मात्र, खबरदारी उपाय म्हणून जुलै 2024 पर्यंत सोलापूर जिल्ह्यात चारा वाहतूक बंदीचे आदेश लागू असतील, असे जिल्हाधिकरी कुमार आशीर्वाद यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत ‘या’ जिल्ह्यामध्ये बंदी

दरम्यान, मागील तीन आठवड्यांच्या काळात सांगली, नाशिक, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील संबंधित जिल्ह्याधिकऱ्यांनी चारा वाहतूक बंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे आता राज्यात भीषण चारा टंचाईचे वास्तव अधोरेखित होत आहे. सध्या ऐन उन्हाळयाच्या तोंडावर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी जनावरांना पुढील काही दिवस पुरेल, अशा चाऱ्याची व्यवस्था करताना दिसून येत आहे. यामध्ये रब्बी पिकांची काढणी सुरु असल्याने, भूस आणि कडबा वाहतूक शेतकरी करत आहेत. मात्र, आता राज्यात जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये चारा वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याने काही शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची समस्या उभी ठाकणार आहे.

दूध उत्पादकांना सर्वाधिक फटका

सध्याच्या चारा टंचाईचा सर्वाधिक फटका दूध उत्पादकांना बसणार आहे. दुधाचे दर कमी, त्यातच आता चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव पैसे देऊनही चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी गत दूध उत्पादकांची झाली आहे. पावसाळा येईपर्यंत जवळपास आणखी चार महिने जाणार आहेत. त्यातही उशिरा पाऊस झाल्यास अडचणीत आणखीच वाढ होते.

error: Content is protected !!