Fodder Treatment with Urea: जनावरांच्या चाऱ्यावर करा युरिया प्रक्रिया; जाणून घ्या फायदे आणि पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात पशुंची विशेष काळजी (Fodder Treatment with Urea) घ्यावी लागते. यात चारा हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे जनावरांचा चारा कसा पौष्टिक करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे चाऱ्याची पौष्टिकता तर वाढतेच शिवाय शेतकर्‍यांना खर्च सुद्धा कमी येतो. जाणून घेऊ या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया (Fodder Treatment with Urea) याबद्दल.  

चाऱ्यावर युरिया प्रक्रिया का करावी? (Fodder Treatment with Urea)

सध्या पाणी टंचाईमुळे चारा पिकांची लागवड करणे कठीण झाले आहे. बरेच पशुपालक चारा टंचाईमुळे (Fodder Shortage) जनावरांच्या आहारात गव्हाचा पेंढा, भात पेंढा, सोयाबीन भुसकट यासारख्या दुय्यम घटकांचा जास्त वापर करतात. निकृष्ट चाऱ्यामध्ये कर्बोदकांच प्रमाण कमी आणि तंतुमय पदार्थ (Fiber) जास्त असतात. तसेच प्रथिने अत्यल्प असतात, त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

युरिया प्रक्रियेचे फायदे (Benefits of Urea Treatment)

  • युरियामध्ये नत्र म्हणजेच नायट्रोजनचे प्रमाण 46 टक्के असते म्हणून युरिया हा नत्राचा अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे.
  • युरीया प्रक्रियेमुळे चाऱ्याची पचनक्षमता वाढते. युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव बदलते, नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात.

युरिया प्रक्रियेची योग्य पद्धत (Fodder Treatment with Urea)

  • गव्हाचा पेंढा, भाताचा पेंढा, उसाचे पाचट इ. चा आपण युरिया प्रक्रियेसाठी वापर करू शकतो.
  • प्रति 100 किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी 4 किलो युरिया 40 लिटर पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यावा. त्यानंतर तयार झालेल्या द्रावणात एक किलो मीठ मिसळून एकजीव करावे.
  • सावलीत कोरड्या जमिनीवर पोते आंथरुन कुट्टी केलेला चारा एकसारखा पसरून घ्यावा. साधारणतः 6 इंच इतका चाऱ्याचा थर करावा.
  • पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या सहाय्याने तयार केलेले मिश्रण शिंपडावे आणि चारा हलवून एकजीव करून घ्यावा. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावे.
  • चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातील जास्तीची हवा काढून घ्यावी.
  • ताडपत्री किंवा प्लॅस्टिक कागदाने चारा हवाबंद करून झाकून टाकावा.
  • 21 दिवस हा चारा हवाबंद ठेवावा, कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते. 21 दिवसानंतरच हा चारा उघडावा.

चारा जनावरांना केव्हा खायला द्यावा (Fodder Treatment with Urea)

  • युरिया प्रक्रियायुक्त चारा जनावरांना खायला देण्यापूर्वी 2- 3 तास अगोदर चारा मोकळ्या हवेत ठेवावा. जेणेकरून त्यामधील अमोनिया गॅस हवेमध्ये उडून जाईल. राहिलेला चारा त्यानंतर पहिल्यासारखा हवाबंद करून ठेवावा.
  • सुरवातीला जनावरांच्या आहारात चारा थोड्या थोड्या प्रमाणात समाविष्ट करून हळूहळू मात्रा वाढवत न्यावी.
  • 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आणि रवंथ न करणाऱ्या जनावरांना हा चारा देऊ नये.

काळजी आणि सूचना ( Precautions To be Taken)

जनावराच्या आहारात युरियाचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर युरियाची विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे जनावर दगावण्याची देखील शक्यता असते. जनावरांमध्ये अमोनियाचे प्रमाण 1 मिलीग्रॅम प्रति 100 मिली रक्तापेक्षा जास्त झाले तर विषबाधा होते.

गायी-म्हशीमध्ये 116 ग्रॅम आणि मेंढीमध्ये 10 ग्रॅमपेक्षा जास्त युरिया खाण्यात आला तर वेगाने जास्तीचा अमोनिया तयार होतो जो विषबाधेसाठी कारणीभूत ठरतो. म्हणून निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना ती अतिशय काळजीपूर्वक करावी लागते.

error: Content is protected !!