हॅलो कृषी ऑनलाईन: तापमानातील चढ-उतार, धुके, जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे गहू पिकावर तांबेरा (Gahu Tambera Rog) रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वातावरणामुळे गव्हावर नारंगी तांबेरा आणि काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. तांबेरा हा गव्हावरील अत्यंत हानिकारक रोग आहे. या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात ८० ते १०० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास दाण्यांवर सुरकुत्या पडून त्याचे नुकसान होते. या लेखात तांबेरा (Gahu Tambera Rog) रोगाची कारणे व त्यावरील नियंत्रण उपाय जाणून घेऊ या.
नारंगी किंवा पानांवरील तांबेरा (Gahu Tambera Rog)
हा तांबेरा पक्सीनिया ट्रीटीसीना (Puccinia triticina) या हवेद्वारा येणार्या बुरशीच्या बीजाणूंमुळे होतो.
१५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान व पानावर किमान ३ तास दव साठल्यास या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो. रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान लहान ठिपके दिसून येतात. अनुकूल हवामानात ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. रोग्रस्त पानावरून बोट फिरवल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते.
काळा किंवा खोडावरील तांबेरा (Gahu Tambera Rog)
रोगकारक बुरशी पक्सीनिया ग्रामिनीस ट्रीटीकीचा (Puccinia graminis tritici) प्रसार हवेद्वारे वाहून आलेल्या बीजाणूंमुळे होतो. पानावर किमान ६ ते ८ तास ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस तापमान या रोगाच्या प्रसारास अनुकूल असते. तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत झपाट्याने वाढतो. या रोगाच्या वाढीसाठी नारंगी तांबेरा रोगापेक्षा साधारण ५.५ अंश सेल्सिअसने जास्त तापमानाची आवश्यकता असते.
रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. अनुकूल हवामानात खोडावर, देठावर, ओंबीवर तसेच कुसळावर देखील रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगग्रस्त पानांवर अंडाकृती ते लंब-गोलाकार आकाराचे हरितद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात. कालांतराने त्या ठिकाणी बुरशीच्या विटकरी रंगाच्या बीजाणूची पावडर दिसून येते. ज्यामध्ये बुरशीचे असंख्य बीजाणू असतात. पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
रोगाचे नियंत्रण उपाय (Control Measures)
- तांबेरा रोगास प्रतिकारक्षम वाणांची पेरणी करावी.
- तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम जाती: फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, फुले अनुपम, एन.आय.ए.डब्ल्यू. ३४, एम.ए.सी.एस. ६२२२, एम.ए.सी.एस. ६४७८.
- शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्यांचे नियोजन करावे. सतत पाणी दिल्यास ओलावा टिकून राहून रोगांचे प्रमाण वाढते.
- रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात. शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
रासायनिक नियंत्रण (Chemical Control Measures)
- मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १० मिलि प्रति लिटर पाणी फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.