Garlic Variety : अकोला विद्यापीठाचे नवीन लसूण वाण विकसित; वाचा वैशिष्ट्ये, उत्पादन किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लसूण लागवड (Garlic Variety) मोठ्या प्रमाणात केली जाते. या भागातील शेतकऱ्यांसाठी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवीन लसणाचे वाण विकसित केले आहे. राज्य सरकारने देखील या लसूण वाणाला मंजुरी दिली असून, पूर्णा नदीच्या नावावरून या वाणाचे नाव विद्यापीठाकडून “पीडीकेवी पूर्णा” असे ठेवण्यात आले आहे. या वाणाला लवकरच केंद्र सरकारकडून मंजुरी मिळणार असून, हे लसूण वाण (Garlic Variety) शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यापीठाचे पहिलेच लसूण वाण (Garlic Variety Developed By Akola Agriculture University)

सध्या घडीला बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच दररोजच्या आहारात उपयोग होत असल्याने, येत्या हंगामात सध्याची दरवाढ पाहता लसूण लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक राहू शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या या वाणाचा मोठा फायदा होणार आहे. मागील चार वर्षांपासून विद्यापीठाकडून या लसूण वाणावर संशोधन सुरु होते. अकोला येथील कृषी विद्यापीठाने आतापर्यंत विविध पिकांच्या एकूण 181 प्रजाती विकसित केलेल्या आहेत. यातील विद्यापीठाचे लसूण वाणाचे हे पहिलेच संशोधन आहे.

काय आहेत ‘या’ वाणाची वैशिष्ट्ये?

केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना लवकरच हे वाण उपलब्ध करून दिले जाणार आहे. पीडीकेवी पूर्णा या वाणापासून शेतकऱ्यांना 120 ते 125 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. महाराष्ट्रात सध्या गोदावरी, श्वेता आणि भीमा लाल या तीन वाणांच्या माध्यामातून लसूण लागवड केली जाते. या तीनही वाणाच्या तुलनेत नव्याने विकसित पीडीकेवी पूर्णा हे वाण शेतकऱ्यांना 15 क्विंटल अधिक उत्पादन मिळवून देते.

भरघोस उत्पादन मिळणार

अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, देशातील 17 कृषी संशोधन केंद्रांमध्ये या नवीन लसूण वाणाचे परीक्षण करण्यात आले आहे. या सर्व परीक्षणात हे लसूण सर्वोत्तम असल्याचे समोर आले आहे. परीक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या निष्कर्षानुसार हे वाण महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांना लागवडीस उपयुक्त ठरणार आहे. इतकेच नाही तर या वाणापासून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळू शकते. असा दावाही विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.

error: Content is protected !!