Geranium Farming : जिरॅनियम शेती शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायदा; वाचा… लागवडीचे तंत्रज्ञान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती (Geranium Farming) आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे. जिरॅनियम पाल्यापासून तेल काढतात. तेलात जिरॅनियम आणि सिट्रोनेलॉल आहे. याचा वापर उपचार पद्धतीमध्ये होतो. जिरॅनियम तेलाचा उपयोग सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर निर्मितीसाठी होतो. तर कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती होते. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड (Geranium Farming) केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे.

प्रमुख प्रजाती कोणत्या? (Geranium Farming Cultivation Technology)

जिरॅनियम लागवडीसाठी (Geranium Farming) मध्यम प्रतीची पाण्याचा चांगल्या प्रकारचा निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही लागवड शक्य आहे. सुरवातीला नांगरणी केल्यानंतर दोनदा कुळवाच्या पाळ्या देऊन, जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर गादी वाफे बनवून लागवड करावी. अलजीरियन, ट्युनिशिया, रीयूनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, आय.आय.एच.आर. – ८, उटी, नर्मदा, इजिप्शियन आणि सिम-पवन इत्यादी जाती महत्वाच्या आहेत.

कसे आहे लागवड तंत्रज्ञान?

रोपे तयार करण्यासाठी एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबरचा कालावधी योग्य आहे. लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात. रोपांची तंतुमय मुळे चांगल्याप्रकारे वाढलेली असावीत. या रोपांची लागवड प्रामुख्याने ६०x६० सेंमी किंवा ७५x६० सेंमी इतक्या अंतरावर करावी. चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे. प्रति हेक्टरी २०० किलो नत्र, ३५ किलो स्फुरद आणि ३५ किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी २० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उर्वरित ८० टक्के नत्र लागवडीनंतर ३०, ४५, ६० आणि ७५ दिवसांनी समान हप्त्यात विभागून द्यावे. १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यानंतर रोपांना भर द्यावी.

किती मिळते उत्पादन?

रब्बी हंगामात साधारणपणे ७ ते ८ दिवसांनी आणि उन्हाळी हंगामात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामात पावसाच्या अंदाजानुसार पाणी द्यावे. पानांचा थोडासा रंग हा फिक्कट पिवळसर होण्यास सुरवात झाल्यावर तसेच सुगंध हा गुलाबासारखा येण्यास सुरवात झाल्यावर कापणी करावी. लागवड केल्यानंतर दर चार महिन्यांनी विळ्याच्या साह्याने कापणी करावी लागते. कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता नसते. हेच पीक तीन वर्षापर्यंत चालते. कधीकधी, ०.१% उत्पन्न मिळू शकते. तीनही कापणीतून प्रति हेक्टर ताज्या वनौषधीचे उत्पादन सुमारे ३० टन आहे. जे उर्ध्वपातनावर सुमारे २४ किलो तेल मिळते. मैदानी प्रदेशात मात्र, सुमारे ४० टन औषधी वनस्पती/हेक्टर/वर्ष उत्पादन मिळते ज्यातून ४० किलो तेल तयार होते.

error: Content is protected !!