हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आले शेतीकडे (Ginger Cultivation) वळत असून, राज्याच्या सर्व भागांत आल्याची कमी-अधिक प्रमाणात लागवड आढळून येत आहे. बाजारात बाराही महिने मागणी असल्याने, आले लागवड (Ginger Cultivation) करण्यास शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. मात्र आता आपणही आपल्या शेतात आले लागवडीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
कोणत्याही पिकाची लागवड (Ginger Cultivation) करताना पहिला प्रश्न पडतो तो वाण कोणते निवडावे? तर सुप्रभा, रीओ दी जेनेरिओ, सुरभी, मरान आणि अथिरा या आल्याच्या पाच प्रमुख प्रजाती आहेत. ज्यामुळे तुमच्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. औषधी गुणधर्मांमुळे आल्याच्या सेवनाने सर्दी, खोकला, पचनाचे आजार, मुतखडा, कावीळ यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. त्यामुळे त्याला कायम मागणी असल्यामुळे बाजारात चांगला भावही मिळतो. आले पिकाची लागवड ही एप्रिलपासून मे अखेरपर्यंत कधीही करू शकतो. नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पीक काढणीला येते.
आल्याच्या प्रमुख पाच प्रजाती (Ginger Cultivation In India)
1) सुप्रभा : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली गेली असून, तिला मोठ्या प्रमाणात फुटवे असतात. तिचे कंद जाड, चमकदार आणि करड्या रंगाचे असते. या जातीला काढणीसाठी सर्वसाधारणपणे 225 ते 230 दिवसांचा कालावधी लागतो. या प्रजातीच्या माध्यमातून शेतकरी एकरी 80 ते 90 क्विंटल उत्पादन घेऊ शकतात.
2) रीओ दी जेनेरिओ : आल्याच्या या जातीच्या लागवडीतून प्रति हेक्टर 200 ते 230 क्विंटल उत्पादन मिळते. या जातीचे कंद हे सफेद आणि चमकदार असतात. या जातीला प्रामुख्याने 225 ते 230 दिवसांचा कालावधी लागतो. ही आल्याची रोगप्रतिकारक्षम जात मानली जाते.
3) सुरभी : या जातीला भरपूर फुटवे असतात. तिचे कंद हे प्रामुख्याने आकर्षक असतात. या जातीला 225 ते 235 दिवसांचा कालावधी लागतो. ही जात राइझोम रॉट रोगास सहनशील आहे. तसेच या जातीद्वारे एकरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
4) मरान : या जातीचा रंग हलका सोनेरी असून, ती प्रामुख्याने 230 ते 240 दिवसांत काढणीला येते. या जातीची उत्पादन क्षमता 175 ते 200 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. ही जात रोगप्रतिकारक्षम मानली जाते.
5) अथिरा : या जातीला प्रामुख्याने 220 ते 240 दिवसांचा कालावधी लागतो. प्रति एकर 84 ते 92 क्विंटल उत्पादन या जातीच्या माध्यमातून मिळू शकते. ही आल्याची सर्वोत्तम जात मानली जाते.