Ginger Washing Center : तरुण शेतकऱ्याने सुरु केले आले वॉशिंग सेंटर; 400 जणांना दिलाय रोजगार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर तरुणाई नोकरीच्या मागे (Ginger Washing Center) न लागता, उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. यात अनेक तरुण शेतीआधारित उद्योगांमध्ये उतरत आहेत. विशेष म्हणजे त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन, अनेक कुटुंबाना आधार मिळत आहे. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या यशस्वी व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्या शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न पळता आले वॉशिंग सेंटरच्या (Ginger Washing Center) माध्यमातून 400 ते 450 मजुरांना रोजगार मिळवून दिला आहे.

शिक्षणानंतर नोकरीला फाटा (Ginger Washing Center In Maharashtra)

सतीश वायाळ असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील चिंचखेडा गावचे रहिवासी आहेत. शेतकरी सतीश वायाळ यांनी शिक्षणानंतर नोकरीचा मागे न लागता आले पिकातून भविष्याचा वेध घेतला आहे. त्यांनी त्यात आपला रोजगार तर शोधलाच मात्र इतरही अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मागील वर्षापासून त्यांनी टेंभुर्णी येथे टेंभुर्णी-जाफराबाद रोडवरील गोंधनखेडा शिवारात आपल्या मालकीचे आले वॉशिंग सेंटर सुरू केले आहे.

दररोज 40 ते 50 टन आवक

शेतकरी सतीश वायाळ यांच्या आले वॉशिंग सेंटरमध्ये दररोज जवळपास 40 ते 50 टन आल्याची आवक होते. त्यासाठी वायाळ यांनी जवळच्या मध्यप्रदेश राज्यातून आले काढणारे खास मजूर उपलब्ध करून घेतले आहेत. सध्या या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी 400 ते 450 मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांचे आले जागेवर खरेदी करून ती धुण्यापासून ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी वायाळ हे स्वतः सांभाळत असतात.

तरुणांनी उद्योजक व्हावे

सध्या आले पिकाला चांगला भाव असल्याने एकरी दहा ते बारा लाखाचे उत्पन्न शेतकरी घेत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोट्या- मोठ्या उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या पाहिजे. या माध्यमातून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधान वाटते. असे शेतकरी व उद्योजक सतीश वायाळ यांनी म्हटले आहे. जाफराबाद तालुक्यात सध्या सोनखेडा, देऊळगाव उगले, सोनगिरी, काळेगाव, बुटखेडा, अकोला, खामखेडा आदी भागात मोठ्या प्रमाणावर आले उत्पादन घेतले जात आहे. आपल्या आले सेंटरवर जालना जिल्ह्यासह परिसरातील बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातून ही अद्रक उपलब्ध होत आहे. असेही सतीश वायाळ सांगतात.

error: Content is protected !!