Goat Bank : शेतकऱ्याने उभारलीये शेळ्यांची बँक; वाचा… कसा चालतो व्यवहार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अशी बँक (Goat Bank) उभी केली आहे. जिचे नाव ऐकून तुम्हीही काही वेळ विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. या शेतकऱ्याने उभारलेल्या आपल्या बँकेला ‘गोट बँक’ असे नाव दिले असून, या बँकेच्या माध्यमातून पैसे नाही तर शेळ्या व्याजाने दिल्या जातात. ”गोट बँक ऑफ कारखेडा” नावाने सुरु झालेल्या या बँकेत कोणताही पैशांचा व्यवहार होत नाही. तर कर्ज स्वरूपात शेळ्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याऐवजी व्याज स्वरूपात प्रत्येक शेळीपासून जन्मलेल्या चार शेळीची पिल्ले (Goat Bank) वापस घेतली जातात.

काय आहे नेमकी संकल्पना? (Goat Bank Set Up By Farmer)

नरेश देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते आपला शेळ्या व्याजाने (Goat Bank) देण्याचा व्यवसाय गेल्या 5 वर्षांपासून करत आहे. त्यांच्या या व्यवसायाची कलपना पाहून तुम्हीही विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळ्या व्याजाने देताना 1100 रुपये बॉण्ड स्वरूपात जमा केले जातात. व्यवहारात पारदर्शकता असावी म्हणून हे पैसे जमा केले जातात. व्यवहार झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक गाभण शेळी दिली जाते. झालेल्या व्यवहारानुसार पुढील 40 महिन्यांच्या कालावधीत संबधित शेतकऱ्यांना त्या शेळीपासून जन्मलेली 4 पिल्ले बँकेला वापस करावी लागतात.

दरम्यान, या आगळ्यावेगळ्या बँकेच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत असून, शेळीपालनाचा व्यवसाय देखील वृद्धिंगत होत आहे. आज बाजारात शेळीची किंमत ही 10 ते 11 हजारांच्या कमी नसते. मात्र या बँकेच्या माध्यमातून गरजूंना फक्त 1100 रुपयांचा बॉण्ड करून, 10 ते 11 हजार किमतीची गाभण शेळी उपलब्ध करून दिली जाते. एक बकरी वर्षभरात दोन वेळा पिल्लांना जन्म देते. तर या बँकेच्या या योजनेतून 40 महिन्यांच्या कालावधीत शेळीच्या बदल्यात, त्या शेळीपासून जन्मलेल्या 4 शेळ्या बँकेला परत कराव्या लागतात.

बँकेची वैशिष्ट्ये

  • 1100 रूपयांच्या करारात गरजूंना व्यवसायासाठी शेळी मिळते.
  • ग्रामप्रेरकाच्या माध्यमातून होतो करार.
  • 40 महिन्यांत चार बकऱ्या बँकेला परत करणे बंधनकारक.
  • बँक लसीकरण, खाद्य आणि रोग प्रतिबंधक सल्ला पुरविते.
  • बँकेची नवी शाखा उघडण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांची आवश्यकता.
  • शाखेसाठी अडीच एकरांत बकरीच्या पशुखाद्यासाठी जंगली वनस्पतींची लागवड आवश्यक.
  • बँकेत बकरीच्या स्वरूपातच कर्ज, व्याज, परतफेड, डिपॉझिटची व्यवस्था.
  • सात ते आठ महिन्यांच्या शेळ्या झाल्यावर विक्रीतून नफा मिळू शकतो.

1100 रुपयात संगोपनासाठी मदत

बँकेने जमा केलेल्या 1100 रुपये या रजिस्ट्रेशन फीमध्ये गरजू शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय मदत आणि पशु लसींच्या माध्यमातून आरोग्य, खाद्य आणि लसीकरण विषयक सल्ल्याची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेळीपालनादरम्यान कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. याशिवाय या अकराशे रुपयांमध्ये शेळ्यांचा विमा देखील काढला जातो. त्यामुळे शेळी दगावल्यास लाभार्थ्यांना नुकसान होण्याची शक्यता नसते.

error: Content is protected !!