Goat Farming : ‘या’ आहेत शेळ्यांच्या तीन विशेष प्रजाती; शेळीपालनासाठी केंद्र सरकारची शिफारस!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन (Goat Farming) व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे शेळीपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध व्हावे. यासाठी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) कर्ज स्वरूपात आर्थिक मदत देखील उपलब्ध करून दिली जात आहे. इतकेच नाही तर केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून देखील शेळीपालन (Goat Farming) व्यवसायाला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.

मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध (Goat Farming Special Breeds Of Goats)

त्यानुसार अलीकडेच केंद्र सरकारकडून देशातील तीन विशेष प्रजातींच्या शेळ्यांबद्दल (Goat Farming) माहिती जारी करण्यात आली आहे. यामध्ये सिरोही, उस्मानाबादी आणि संगमनेरी या प्रजातीच्या शेळ्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. शेळीपालन तज्ज्ञांच्या मते, देशातील या तीनही शेळ्यांच्या प्रजाती मांस उत्पादनासाठी पाळल्या जातात. यातील सिरोही ही शेळी मूळची राजस्थानची प्रजाती आहे. तर उस्मानाबादी आणि संगमनेरी या प्रजातीच्या शेळ्या महाराष्ट्रात आढळतात. विशेष म्हणजे या तिन्ही प्रजातीच्या शेळ्यांच्या मांसाला मोठी मागणी आहे. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी या शेळ्यांच्या मांसाला खूप मागणी असते.

शेळयांच्या तीन विशेष प्रजाती

1. सिरोही शेळी : सिरोही प्रजातीच्या शेळ्यांचा रंग तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण असते. या शेळ्यांच्या अंगावरील केस दाट व लहान असतात. शेळी आणि बोकड या दोघांची शरीरे मध्यम आकाराची असतात. या प्रजातीच्या शेळीचे शेपूट वक्र असून, अंगावर दाट केस असतात. तसेच या शेळीचे शिंगे लहान व तीक्ष्ण आणि मागे वळलेली असतात. या शेळीच्या बोकडाचे सरासरी वजन 50 किलो असते आणि शेळीचे वजन 23 किलो असते. जन्माच्या वेळी लहान बकराचे सरासरी वजन दोन किलोग्रॅमपर्यंत असते. या जातीच्या शेळ्या वर्षातून एकदा दोन पिल्लांना जन्म देतात.

2. उस्मानाबादी शेळी : उस्मानाबादी जातीची शेळी (Goat Farming) ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यासह लातूर, तुळजापूर आणि उदगीर भागात आढळते. या प्रजातीच्या शेळ्या आकाराने मोठ्या असतात. या जातीच्या शेळ्या 73 टक्केपर्यंत पूर्णपणे काळ्या रंगाच्या असतात. तर 27 टक्के पांढरे आणि तपकिरी रंगाचे डाग असतात. उस्मानाबादी शेळी ही दूध आणि मांस दोन्हीच्या उत्पादनासाठी पाळली जाते. या जातीच्या शेळीचा दूध देण्याचा कालावधी चार महिन्यांचा असतो. या जातीच्या शेळ्या दररोज अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देतात. या प्रजातीची शेळी वर्षातून दोनदा दोन पिलांना जन्म देते. या जातीच्या एका शेळीपासून 45 ते 50 किलोपर्यंत मांस मिळते.

3. संगमनेरी शेळी : शेळीची ही संगमनेरी जात साधारणपणे महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आढळते. या जातीच्या शेळ्या या मध्यम आकाराच्या असतात. संगमनेरी शेळ्यांचा रंग एकसारखा नसतो; पांढऱ्या, काळ्या किंवा तपकिरी व्यतिरिक्त, इतर रंगांचे डाग देखील आढळतात. या जातीच्या शेळयांचे कान खालीच्या बाजूने वाकलेले आहेत. या जातीच्या शेळी आणि बोकडांची दोन्ही शिंगे मागच्या बाजूला झुकलेली असतात. संगमनेरी जातीची शेळी दिवसाला अर्धा ते एक लिटर दूध देते. ते आपल्या प्रजनन काळात एकूण 165 दिवस दूध देते.

error: Content is protected !!