हॅलो कृषी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासह (Gokul Milk Subsidy) गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये दर दिला जाणार आहे. गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच हा दर राज्यातील दूध संघांकडून दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा (Gokul Milk Subsidy) उच्चांकी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला आहे. लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये सतत घसरण सुरू असून गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपयेपर्यंत कमी झाले आहेत. परंतु गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३३ रुपये इतका स्थिर ठेवला आहे.
यामध्ये राज्य शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान (Gokul Milk Subsidy) जाहीर केले आहे. त्यामुळे गोकुळकडून प्रतिलिटर दिले जाणारे ३३ रुपये आणि शासनाचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान असे गोकुळला गाय दूध देणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये उच्चांकी दर मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा अखेर दूध अनुदानाचा ‘जीआर’ आला; ‘या’ असतील अटी? वाचा संपूर्ण जीआर!
राज्यातील खासगी व सहकारी दूध संघानी ३.५ फॅट व ८.५ एस.एन. एफ. करिता किमान प्रतिलिटर २७ रुपये दर देणे शासनाने बंधनकारक केले आहे. सध्या गोकुळचा गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन. एफ. साठी प्रतिलिटर ३३ रुपये आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात संकलित होणाऱ्या गायीच्या एकूण दुधापैकी प्रतिदिनी जवळपास ७ लाख लिटर इतके दूध गोकुळकडून संकलित केले जात असून शासनाकडून मिळणारे पाच रुपये अनुदान (Gokul Milk Subsidy) हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. या अनुदानापासून गोकुळ संलग्न कोणताही गाय दूध उत्पादक वंचित राहू नये, यासाठी गोकुळकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.