हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील पिकांसह मका काढणी (Grain Dryer) अंतिम टप्प्यात असून, काही शेतकऱ्यांनी मकाच्या कणीसांचा ढीग मारून ठेवला आहे. जेणेकरून हंगाम संपल्यानंतर दरवाढीचा फायदा मिळू शकेल. तर काही शेतकरी सध्या आपला मका बाजारात (Grain Dryer) विक्रीस नेत आहेत. मात्र आता मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बिहार कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी देशातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी ग्रेन ड्रायर हे यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे आता अत्यंत कमी खर्चात मका आणि अन्य धान्य वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रेन ड्रायर म्हणजे काय? (Grain Dryer Developed By Bihar University)
ग्रेन ड्रायर म्हणजे सोप्या शब्दात धान्य सुकविण्याचे किंवा वाळविण्याचे यंत्र होय. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना आपला मका, गहू, तांदूळ यांची वाळवणी करण्यास मोठी मदत होणार आहे. कापणी झाल्यानंतर प्रामुख्याने धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता (पाण्याचा अंश) शिल्लक असते. ज्यामुळे धान्याला कीड, बुरशी आणि अळ्या लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. मात्र आता या ग्रेन ड्रायरच्या मदतीने शेतकऱ्यांना आपले धान्य वाळवून साठवणूक करण्यास विशेष मदत होणार आहे. मका आणि गहू या पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील अनेक भागात साठवणुकीसाठी मका रस्त्यावर वाळवला जातो. याला खूप दिवसांचा कालावधी लागतो, तसेच मकाची गुणवत्ताही खालावते. त्यामुळे शेतकर्यांची ही अडचण लक्षात घेऊन बिहार येथील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी छोटेखानी मका सुकवणी यंत्र विकसित केले आहे.
किती आहे किंमत?
आजपर्यंत ग्रेन ड्रायर या यंत्राची किंमत अधिक असल्याने शेतकरी ते खरेदी करू शकत नव्हते. मात्र आता केवळ 20 ते 25 हजारांमध्ये हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे. हे यंत्र देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी बिहार विद्यापीठाकडून नालंदा कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे. या यंत्रामुळे केवळ सहा ते सात तासांमध्ये पाच क्विंटल मका किंवा धान्य वाळवणे शक्य होणार आहे. या यंत्रासाठी शेणापासून बनवलेल्या पाच किलो गोवऱ्या इंधन म्हणून वापरल्या जाणार आहे. तसेच त्याची मोटर विजेवर किंवा सौरऊर्जेवरही चालेल. असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. या यंत्राची चाचणी विद्यापीठाकडून सध्या काही शेतकऱ्यांच्या खळ्यावरती केली जात आहे. येत्या काळात यंत्रातील सुधारणा करून, नालंदा कंपनीमार्फत हे यंत्र देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहे.