Grapes Export : यावर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला उच्चांकी द्राक्ष निर्यात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. असे असतानाही राज्यातून विक्रमी द्राक्ष निर्यात (Grapes Export) झाली आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामात 15 एप्रिलपर्यंत देशातून 1,81,396 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. यामध्ये अमेरिका व युरोपीयन युनियनला उच्चांकी 1,31,421 टन, तर अन्य देशांना 50,195 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका आणि युरोपीयन युनियनला सरासरी 90 हजार ते एक लाख टन द्राक्ष निर्यात (Grapes Export) होते.

आजवरची उच्चांकी निर्यात (Grapes Export From Maharashtra)

1 नोव्हेंबर 2023 ते 15 एप्रिल 2024 पर्यंत देशातून 1,81,396 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. त्यात अमेरिका आणि युरोपीयन युनियनला आजवरची उच्चांकी 1,31,421 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. ही निर्यात प्रामुख्याने नेदरलँडला (हॉलंड) झाली आहे. अमेरिका आणि युरोपीयन युनियन वगळता अन्य देशांना 50,195 टन इतकी निर्यात झाली आहे. असे राज्यसरकारच्या कृषी विभागाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

विक्रमी 110 रुपयांपर्यंत भाव

यंदा द्राक्ष निर्यातीला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. सुरुवातीला निर्यातीला दर 40 ते 50 रुपयांदरम्यान होता. हंगाम मध्यावर असताना 60 ते 65 रुपये प्रति किलो दर होता. अखेरच्या टप्प्यात काही निवडक दर्जेदार द्राक्षांसाठी प्रति किलो 90 ते 110 रुपये दर मिळाला आहे. अद्यापही सोलापूर, नारायणगाव परिसरात निर्यातक्षम द्राक्षे उपलब्ध आहेत. पण, यंदाच्या हंगामात अनेकदा झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

सुरुवातीपासूनच अडथळ्याची शर्यत

दरम्यान, यंदाच्या द्राक्ष निर्यात हंगामाला सुरुवातीपासून अडथळ्याची शर्यत पार करावी लागली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेव्हापासून आतापर्यंत टप्प्याटप्प्याने अवकाळी पावसाचे ग्रहण कायम आहे. याशिवाय इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे लाल समुद्रातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून वाहतूक करावी लागली. यातही वाहतुकीच्या दरातही वाढ झाली. मात्र, असे असतानाही यंदा अमेरिका आणि युरोपला यंदा उच्चांकी निर्यात झाली आहे.

error: Content is protected !!