Grapes Export : द्राक्ष उत्पादकांनी करून दाखवले; गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक द्राक्ष निर्यात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या द्राक्ष हंगामाला (Grapes Export) मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. सुरुवातीला द्राक्ष हंगामाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हे कमी काय? ऐन निर्यात हंगाम सुरु झाल्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे राज्यातील द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर मार्ग काढत दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून निर्यात सुरु झाली. अर्थात अनेक अडथळे असूनही यंदा एक महिना आधीच द्राक्ष निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. यंदा राज्यातून ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७२१ टन द्राक्ष निर्यात (Grapes Export) करण्यात आली आहे.

22 हजार टन द्राक्ष निर्यात अधिक (Grapes Export From Maharashtra)

मागील वर्षीच्या द्राक्ष हंगामात सामान्य परिस्थिती असूनही जवळपास १ लाख २८ हजार १७८ टन द्राक्ष निर्यात (Grapes Export) करण्यात राज्याला यश मिळाले होते. मात्र, यंदाच्या हंगामामध्ये आधीच अवकाळी पावसामुळे द्राक्ष गुणवत्तेला फटका बसला होता. त्यातच भूमध्य सागर-लाल समुद्रमार्गे जलवाहतूक थांबल्याने निर्यातीला फटका बसला. मात्र, असे असतानाही यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २२ हजार टन अधिक द्राक्ष निर्यात झाली आहे.

‘या’ देशांमध्ये झाली निर्यात

यावर्षीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने रशिया, चीन, यूएई, मलेशिया, बांगलादेश देशांमध्ये एकूण ३५ हजार ७२२ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. तर नेदरलँड, जर्मनी, बेल्झियम, डेन्मार्क या युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ९९९ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अर्थात यावर्षी एकूण १ लाख ४९ हजार ७२१ क्विंटल द्राक्ष निर्यात विविध देशांत करण्यात आली आहे.

संकटांना संयमाने दिली मात

राज्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, उगाव, निफाड, वडनेर भैरव या प्रमुख द्राक्ष उत्पादक भागांतून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागांमध्ये देखील दररोज मोठ्या प्रमाणात द्राक्ष पाठवली जात होती. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या हंगामात अनेक संकटे येऊनही द्राक्ष उत्पादकांनी यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेने २२ हजार क्विंटल द्राक्ष अधिक प्रमाणात निर्यात केल्याने, यंदाचा हंगाम समाधानकारक ठरला आहे.

error: Content is protected !!