Grapes Export : राज्यातील द्राक्ष निर्यातीला ‘ब्रेक’; इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ राज्यातील द्राक्ष (Grapes Export) उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. या युद्धामुळे राज्यातून युरोप खंडातील देशांना होणाऱ्या द्राक्ष निर्यातीला पूर्णतः ब्रेक लागला आहे. पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. परिणामी राज्यातील द्राक्ष निर्यातीला (Grapes Export) पूर्णतः ब्रेक लागला आहे.

द्राक्ष निर्यातीसाठी (Grapes Export) सुएझ कालवा या जलमार्गाच्या माध्यमातून युरोपीय देशांमध्ये जहाजांना 7200 किमी अंतर पार करण्यास 21 दिवस लागतात. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप या दक्षिणेकडील टोकाला वळसा घालून गेल्यास हेच अंतर 19 हजार 800 किमी एवढे आहे. परिणामी द्राक्ष निर्यातदारांच्या जहाजांना युरोपीय देशांमध्ये द्राक्ष पाठवण्यास 34 ते 38 दिवस लागणार आहेत. या महिनाभराहून अधिक काळात द्राक्ष खराब होण्याची चिंता निर्यातदार व्यक्त करत आहे. निर्यातदारांनी द्राक्ष निर्यात पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे आता याचा थेट परिणाम हा राज्यातील द्राक्ष निर्यातीवर झाला असून, आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

अडीच महिन्यापासून युद्ध सुरुच! (Grapes Export Stops From Maharashtra)

7 ऑक्टोबर रोजी सुरू झालेले इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध मागील अडीच महिन्यापासून सुरूच असून, या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा जीव गेला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास ही संघटना आणि इस्रायल यांच्यात गाझा पट्टीवरून असलेल्या वादामुळे, दोन्ही बाजूने एकमेकांवर सातत्याने क्षेपणास्र हल्ले केले जात आहे. मात्र आता युद्धाने राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, सरकारने द्राक्ष वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी काही पावले उचलावीत, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पर्यायी मार्गावर विचार सुरु

इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्धामुळे एपी मोलेर, एमएसी, सीएमए, सीजीएम आणि हपाग-लेयॉड या निर्यातदार कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत लाल समुद्राचा मार्ग निर्यातीसाठी टाळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, नवीन मार्ग अजून ठरवायचा असून, त्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे कंपन्यांनी निर्यातदारांना कळविले आहे. मात्र असे असले तरी पर्यायी मागनि द्राक्ष कंटेनर पाठवायचे ठरल्यास वेळ आणि पैसा लागणार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका द्राक्ष निर्यातीला बसणार आहे.

error: Content is protected !!