Halad Farming : हळद उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; एकरात 6 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादकांना (Halad Farming) यंदा ‘अच्छे दिन’ आले आहे. राज्यात प्रामुख्याने सांगली, हिंगोली जिल्हा आणि आसपासचा परिसर हळद उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरातील हळदीला अलीकडेच ‘बसमत हळद’ म्हणून जीआय मानांकन देखील प्राप्त झाले आहे. हिंगोली बाजार समिती हळदीसाठी विशेष प्रसिद्ध असून, या ठिकाणी विदर्भ-मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून हळद विक्रीसाठी येत असते. अशातच आता नांदेड जिल्ह्याच्या धानोरा येथील एका शेतकऱ्याने विक्रमी हळद उत्पादन (Halad Farming) घेतले आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या यशस्वी हळद उत्पादनाबाबत जाणून घेणार आहोत.

अवकाळी पावसाने अडथळा (Halad Farming Farmer Earn 6 Lakhs Per Acre)

गणेश शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते धानोरा (रुई) ता. हदगाव जिल्हा-नांदेड येथील रहिवासी आहेत. गणेश यांनी यंदा आपल्या एक एकर रानात हळदीची लागवड (Halad Farming) केली होती. मात्र, गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसादरम्यान गणेश यांची हळद काढणी सुरु होती. ज्यामुळे त्यांना ऐन काढणीला आलेल्या हळदीला अवकाळी पावसामुळे दर घसरण फटका बसण्याची भीती होती. मात्र, सध्या हळदीचे दर टिकून असल्याने त्यांना मोठा फायदा झाला आहे.

किती मिळाले उत्पादन, उत्पन्न?

शेतकरी गणेश शिंदे सांगतात, “मागील काही दिवसांपासून पावसामुळे हळद काढणीला (Halad Farming) ब्रेक लागला होता. मात्र, सध्या आपल्या एक एकर रानातील हळद काढणी आटोपली आहे. त्यातून आपल्याला एकरी 40 क्विंटल इतके उत्पादन मिळाले आहे. सध्याच्या 15 ते 17 हजार रुपये सरासरी दराने आपल्याला 6 लाख रुपये एकरी आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आपल्याला हळद पिकातून अधिक उत्पन्न मिळाले आहे.”

यंदा उच्चांकी दराने समाधान

शेतकरी गणेश शिंदे सांगतात, आपण दरवर्षी हळदीची लागवड करतो. मात्र, गेल्या पाच एक वर्षात हळदीला चांगला दर मिळत नव्हता. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अन्य पिकांची वाट धरली होती. मात्र, आता यंदा हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोने झाले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा मिळालेला दर हा कायम मिळत राहिल्यास शेतकरी नक्कीच पुन्हा हळद लागवडीकडे वळतील, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!