Harbhara Bajar Bhav : राज्यात नवीन हरभऱ्याची आवक सुरु; 5,700 ते 6,200 रुपये मिळतोय दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्याच्या (Harbhara Bajar Bhav) विशेषतः तुरीच्या दराने चांगलाच जोर पकडला आहे. काही मोजक्या बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. अशातच आता कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. या नवीन हरभऱ्याला राज्यात सध्या 5,700 ते 6,200 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. यावर्षी देशभरात हरभरा लागवडीखालील क्षेत्रात घट नोंदवली गेली असून, उत्पादनातही घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे दर (Harbhara Bajar Bhav) यावर्षी किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

6000 रुपयांच्या आसपास दर (Harbhara Bajar Bhav Today 3 Feb 2023)

केंद्र सरकारने 2024-25 च्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा हमीभाव 5440 रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित केला आहे. असे असतानाच महाराष्ट्रातील काही निवडक बाजार समित्या वगळता हरभऱ्याला सध्या कमाल 6000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाअभावी हरभऱ्याची पेरणी कमी झाली आहे. ज्यामुळे या भागातील हरभरा उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. याउलट मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये सध्या हरभऱ्याचे पीक जोमात आहे. परंतु, एकूण देशातंर्गत उत्पादनात घट नोंदवली गेल्यास, हरभरा दर हे हमीभावापेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.

उत्पादनात घट होण्याची शक्यता

आगामी 15 दिवसांमध्ये रब्बी हंगामातील देशातील हरभरा उत्पादनाबाबतची माहिती समोर येऊ शकेल. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा पिकाला पोषक वातावरण मिळत असून, सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे. ज्यामुळे शेवटच्या टप्प्यात पाणी भेटल्याने, हरभरा पिकाला मदत मिळणार असल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, यावर्षीच्या रब्बी हंगामात देशातील 102.90 लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. जी मागील वर्षीच्या रब्बी हंगामात 109.73 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. त्यामुळे उत्पादनात घट झाल्यास, त्याची हरभरा दरात वाढ होण्यास मदत होऊ शकते.

error: Content is protected !!