Harbhara Rate : आवक मंदावल्याने हरभरा दरात तेजी; पहा ‘काय’ आहेत दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील बाजार समित्यांमध्ये आवक मंदावल्याने चालू आठवड्यात हरभरा दरात (Harbhara Rate) तेजी पाहायला मिळाली. दिवाळीच्या सणामुळे या आठवड्यात देशातील बाजार समित्या काही दिवस बंद होत्या, त्यामुळे मागणीतील वाढ आणि सीमित पुरवठा झाल्याने ही दरवाढ (Harbhara Rate) पाहायला मिळत आहे.

व्यापारी आणि शेतकऱ्यांकडे सध्या अल्प प्रमाणात हरभरा उपलब्ध आहे. मात्र, नाफेडकडे हरभऱ्याचा मोठा साठा उपलब्ध आहे. त्यातच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरभरा लागवडीत घट नोंदवली गेली आहे. परिणामी, येत्या काळात लागवडीतील घट आणि उपलब्ध असलेला अल्प साठा यामुळे हरभरा दरात तेजी कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत देशात 44.66 लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या लागवडीच्या तुलनेत 5 लाख हेक्टरने कमी आहे.

महाराष्ट्र

मागणीत वाढ झाल्याने चालू आठवड्यात महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये हरभरा दरात प्रति क्विंटलमागे 75 ते 150 रुपयांची वाढ दिसून आली. राज्यात प्रामुख्याने या आठवड्यात सोलापूर बाजार समितीत हरभऱ्याला 5600 ते 6400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. अकोला बाजार समितीत हरभऱ्याला 6200 ते 6250 रुपये प्रति क्विंटल, लातूर बाजार समितीत हरभऱ्याला 6000 ते 6100 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 6150 ते 6200 रुपये प्रति क्विंटल, उदगीर बाजार समितीत हरभऱ्याला 5900 ते 6100 रुपये प्रति क्विंटल तर अहमदनगर बाजार समितीत हरभऱ्याला 6300 ते 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

कर्नाटक (Harbhara Rate In India)

यावर्षी पावसाअभावी कर्नाटकातील हरभरा लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यातच आता राज्यातील बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने हरभरा दरात प्रति क्विंटलमागे 50 ते 100 रुपयांची वाढ या आठवड्यात दिसून आली. या आठवड्यात गुलबर्गा बाजार समितीत हरभऱ्याला 5800 ते 6250 रुपये प्रति क्विंटल, बीदर बाजार समितीत 5186 ते 6109 रुपये प्रति क्विंटल तर गदग येथील बाजार समितीत हरभऱ्याला 5262 ते 6123 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

राजस्थान

राजस्थानमध्येही बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात आवक झाल्याने या आठवड्यात हरभरा दरात 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ नोंदवली गेली. जोधपूर बाजार समितीत हरभऱ्याला प्रति क्विंटल 4800 ते 5850 रुपये दर मिळाला. जयपूर बाजार समितीत हरभऱ्याला 6475 ते 6525 रुपये प्रति क्विंटल, किशनगढ बाजार समितीत हरभऱ्याला 5200 ते 6000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

दरम्यान, दिवाळी आणि विधानसभा निवडणुकांमुळे प्रमुख हरभरा उत्पादक राज्य असलेल्या मध्यप्रदेशात या आठवड्यात बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाही. याशिवाय उत्तरप्रदेशातील कानपुर बाजार समितीत या आठवड्यात हरभरा दरात प्रति क्विंटलमागे 125 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. कानपुर बाजार समितीत हरभऱ्याला या आठवड्यात 6525 ते 6575 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

हरभरा डाळीचे दरही वाढले

या आठवड्यात हरभरा डाळीच्या दरातही प्रति क्विंटलमागे 50 ते 100 रुपये वाढ दिसून आली. दिल्लीमध्ये हरभरा डाळ 7350 ते 7600 रुपये प्रति क्विंटल दराने मिळत आहे. गुलबर्गा येथे हरभरा डाळ 7200 ते 7400 रुपये प्रति क्विंटल, जळगाव येथे 7350 रुपये प्रति क्विंटल, इंदोरमध्ये 7200 ते 7500 रुपये प्रति क्विंटल, तर कानपुर येथे 7100 ते 7150 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा डाळ मिळत आहे.

error: Content is protected !!