प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झालाय ? कसे जगवाल वावरातल्या कापूस पिकाला ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतात असलेल्या कापूस पिकावर झाला आहे. अशावेळी पिकावर परिणाम होतो. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. आजच्या लेखात आपण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यावर कापूस पिकाची काळजी कशी घ्यावी ? जाणून घेऊया…

कापूस पिकाला अतिपाऊस झाल्याने काय होतो परिणाम ?

–पीक पाण्यात दीर्घकाळ बुडून राहिल्यास कपाशीच्या मुळ्या सडतात.
— कपाशी मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळे आवश्यक ती अन्नद्रव्ये उचलू शकत नाहीत.
— झाडे सुकू लागतात किंवा मलूल होतात, त्यालाच आकस्मिक मर रोग असे म्हणतात.
— वास्तविक यासाठी कोणतीही बुरशी, जिवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीत. म्हणजेच हा रोग नाही.
–कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण व मलूल होतात. खालच्या बाजूने वाकतात. झाडांमधील ताठरपणा कमी होतो. झाड मेल्यासारखे दिसते.

उपाययोजना 

-शेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे. सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी. अशी मरग्रस्त कपाशीझाडे आढळल्यास थोडाफार वाफसा येताच झुकलेली झाडांना झुकलेल्या बाजूकडून मातीची भर द्यावी. ती सरळ करून, दोन पायांमध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत. अशा झाडांच्या बुंध्यापाशी कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक युरिया १५ ग्रॅम अधिक पोटॅश १० ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सि क्लोराईड प्रति २०० लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. पाठीवरील पंपाचे नोझल काढून, प्रत्येत झाडाजवळ साधारण १०० मिलि द्रावण बांगडी पद्धतीने पडेल, असे पाहावे. त्यानंतर झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे. आकस्मिक मर रोखण्यासाठी कपाशीच्या शेतात भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी कोळपण्या कराव्यात.

पाऊस उघडिपीनंतर कपाशीचे व्यवस्थापन

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुढील उपाययोजना कराव्यात. पिकातील आंतरमशागतीची कामे स्वच्छ व कोरड्या वातावरणात करावीत. बीटी/संकरित कपाशीस सुरवातीच्या काळात येणाऱ्या फुलांचे रूपांतर पात्यात व बोंडात होण्याचे प्रमाण जास्त असते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी व नंतर होणाऱ्या लाल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीद्वारे मुख्य अन्नद्रव्यासोबत दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीही आवश्यक असते. लाल्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशीवर मॅग्नेशिअम सल्फेट १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम अधिक + युरिया १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी. या द्रावणामध्ये कोणत्याही कीडनाशकाचा वापर करू नये. कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) किंवा १९:१९:१९ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या अन्नद्रव्यांची ४५ व ६५ व्या दिवशी फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत ००:५२:३४ (४ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. फुलोरा अवस्था, पाते व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) ही फवारणी करावी.

नैसर्गिक कारणामुळेही कपाशीची पात्या, फुले, बोंडे यांची गळ होते. ती कमी करण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) या वाझ नियंत्रकाची ३ ते ४ मिलि प्रति १० लिटर पाणी अशी पहिली फवारणी करावी. यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी. कपाशीची कायिक वाढ जास्त होऊन बोंडे कमी लागली असल्यास, क्लोरमेक्वाट क्लोराईड (५० % एस.एल.) या वाढ नियंत्रकाची १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कपाशीच्या परिपक्व बोंडाची बाह्य बोंड सड होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा प्रोपीनेब (७० डब्लू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच अंतर्गत बोंड सड रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लू.पी.) २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पाऊस उघडिपीनंतर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यावर लक्ष ठेवावे.

error: Content is protected !!