हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून आर्थिक स्थितीही बिकट झालेली पहायला मिळते. अशातच संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील जरंडी आणि आमखेडा गावात अवकाळी पावसाने झोडपलं आहे. दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास गहू, मका, ज्वारी, केळी तसेच इतर झाडं भुईसपाट झाली आहेत.
सोयगाव, आमखेडा आणि जरंडी परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. काही घरांची पत्रे उडून गेली. तसेच झाडे देखील जमीनदोस्त झाली. अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अशातच १७ जन जखमी झाले आहेत.
घरांची पत्रे उडून १७ जन जखमी
लक्ष्मीबाई राजेंद्र जाधव (वय २५ वर्षे), ईश्वर तुकाराम बडक (वय ४५ वर्षे), पूजा राजेंद्र जाधव (वय ३ वर्ष), दीदी राजेंद्र जाधव (वय २ वर्षे) आणि रत्नाबाई संदीप मिसाळ (वय ३२ वर्षे) यांच्यासह इतर लोकांचाही जखमीत समावेश आहे. यात २ लहान बालके होती तसेच २ महीला आणि एक वृद्ध व्यक्ती होते. जखमींना गावकऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे या अवकाळी पावसामुळे वाहतूक देखील ठप्प झाली. यामुळे इतर नागरिकांना वाहतुकीची समस्या जाणवू लागली आहे.
सोयगावात झाडे जमीनदोस्त; ट्रॅफिकने जीव मेटाकुटीला
सोयगाव या भागात अवकाळी पावसाने झाडे जमीनदोस्त झाली आहेत. ही झाडे रस्त्यावर पडल्याने रहदारी निर्माण झाली. यामुळे लोकल वाहन चालकांमध्ये निराशा दिसली असून वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पंचायत समितीसमोरही झाडे रस्त्यावर पडल्याने या भागात ट्रॅफिक झाल्याचं चित्र पहायला मिळत होतं. यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.