सद्य हवामान स्थितीत कसे करावे पीक व्यवस्थापन ? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वावरतील उरले सुरले पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. अशात तूर कापूस पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्यवस्थापन

१)सोयाबीन : काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण 14 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 400 ते 500 आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण 13 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 300 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल.

२)खरीप ज्वारी : काढणी केलेल्या खरीप ज्वारीची कणसे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेल्या दाण्यांची उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल.

३)बाजरी : काढणी केलेल्या बाजरीची कणसे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेल्या दाण्यांची उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल.

४)ऊस : पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५)हळद : हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

६) हरभरा : कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबर अखेर पर्यंत संपवावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X 10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश (109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 54.25 किलो युरिया + 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

७)करडई : कोरडवाहू करडई पिकाची पेरणी ऑक्टोबर अखेर पर्यंत संपवावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे (पेरणीच्या वेळी 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 31 किलो युरिया किंवा 65 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी द्यावे व पेरणी नंतर एक महीन्यानी 65 किलो युरिया द्यावा).

 

error: Content is protected !!