Mango Pest Control: आंब्यावरील विविध किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा पिकावर वेगवेगळ्या अशा 400 किडींचा (Mango Pest Control) प्रादुर्भाव होतो. या किडीमुळे आंबा पिकाचे 80 टक्केपर्यंत नुकसान होते. आंब्याचे किडींमुळे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवण्यासाठी किडींचे नियंत्रण उपाय (Mango Pest Control) जाणून घेऊ या.  

आंबा पिकावरील प्रमुख किडी (Important Pests In Mango)

  • तुडतुडे: पिले व प्रौढ आंब्याचा मोहोर, कोवळी पालवी, कोवळी फळे यातून रस शोषतात. मोहोर व लहान फळांची गळ होते. आंबा उत्पादनात 70 ते 80 टक्के घट येते.

नियंत्रण: (Mango Pest Control)

  • फांद्याची विरळणी करून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश ठेवावा.
  • वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डेल्टामेथ्रीन या कीटकनाशकांची (2.8 टक्के प्रवाही) 0.9 मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
  • मोहोर येण्यापूर्वी ब्युप्रोफेझिन (25 टक्के प्रवाही) 2 मिली किंवा  डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 1 मिली किंवा इमिडाक्‍लोप्रीड (17.8 टक्के प्रवाही) 0.3 मिली या कीटकनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
  • फुलकिडे: पिले व प्रौढ फुलकिडे पानाची साल खरवडून पानातील रस शोषतात. पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पानगळ होऊन शेंडे शिल्लक राहतात.

नियंत्रण:

  • पालवीवरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 1.5 मिली प्रतिलिटर पाणी फवारणी करावी.
  • फळांवरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, स्पिनोसॅड (45 टक्के प्रवाही) 0.25 मिली किंवा थायोमेथॉक्‍झाम (25 टक्के) 0.2 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
  • मिजमाशी (Midge fly): या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, मोहोरावर, तसेच लहान फळांवर आढळतो. मादी माशी सालीच्या आतमध्ये अंडी घालते. अळ्या बाहेर पडल्यानंतर पेशींवर आपली उपजीविका करतात. परिणामी त्या ठिकाणी बारीक, फुगीर, गाठ तयार होते. पूर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून जमिनीवर पडते. शेंडे जळतात. त्यामुळे मोहोरदेखील गळतो किंवा वाळतो. मोहोराची दांडी वेडीवाकडी होते. फळगळ होते.

नियंत्रण:

  • अळ्या जमिनीत असल्यामुळे झाडाखालची जमीन उकरून त्यात शिफारशीत दाणेदार कीटक मिसळावे.
  • झाडाखाली काळे प्लॅस्टिक अंथरून घ्यावे. कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्या प्लॅस्टिकवर पडतात. जमिनीत जाता न आल्याने मरतात.
  • आंब्याला मोहोर फुटू लागताच फेनीट्रोथिऑन 1 मिली किंवा डायमेथोएट 1.25 मिली प्रति लिटर पाणी झाडांवर फवारणी करावी.
  • शेंडा पोखरणारी अळी: ही अळी पालवीच्या तसेच मोहोराच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते. कीडग्रस्त फांदी तसेच मोहोर सुकून जातो. फांद्यावर गाठी निर्माण होतात व फांद्या अशक्त राहतात.

नियंत्रण:

  • प्रादुर्भाव कमी असताना कीडग्रस्त पालवी किंवा मोहोर किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावेत.
  • कोवळी फुट निघल्यानंतर कार्बारिल 50 % प्रवाही 0.2% किंवा क्विनॉलफॉस 25% प्रवाही 0.05% किंवा निंबोळी अर्क 5% किटकनाशकांची फवारणी करावी.
  • डायक्‍लोरव्हॉस (76 टक्के प्रवाही) 1 मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
  • लाल कोळी: ही कीडपानाच्या मागे तयार झालेल्या जाळीखाली राहून पानातील रस शोषतात. पाने तेलकट, तांबूस होऊन अर्धवट वाळतात. नंतर भरपूर पानगळ होते.

नियंत्रण:

 पाण्यात मिसळणारे गंधक (80 टक्के भुकटी) 2 ग्रॅम अथवा डायकोफॉल 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी .

  • फळमाशी (Fruit Fly): काढणीस तयार झालेल्या फळांमध्ये मादी फळमाशी अंड नलिकेच्या सहाय्याने फळाच्या सालीखाली पुंजक्यात अंडी घालते. एका पुंजक्यात सुमारे 100-300 अंडी घालते. अळी गरावर उपजीविका करते, त्यामुळे फळे कुजतात आणि खाली गळून पडतात. परिणामी अशी फळे खाण्यायोग्य राहत नाहीत.

नियंत्रण:

  • फळे पक्व होण्याआधी काढावीत. पक्व झालेली फळे गळून बागेत पडतात, त्यामुळे फळमाशीची उत्पत्ती वाढते. ते टाळण्यासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत (Mango Pest Control) .
  • झाडाखालची माती हलवून घेतल्यास कोष उघडे पडून सूर्यकिरणे व पक्षाद्वारे नियंत्रण होण्यास मदत होते.
  • फळमाशी ही तुळशीमधील मिथाईल युजेनॉलकडे आकर्षित होते. बागेमध्ये तुळशीची झाडे लावावीत.
  • खराब फळे, गुळपाणी, मॅलॅथिऑन (50 टक्के ईसी) आणि मिथाईल युजेनॉलचा वापर विषारी आमिष तयार करून बागेत लावावेत.
  • अंडी आणि अळ्यांच्या नियंत्रणासाठी काढणी पश्चात फळांना उष्ण जल किंवा वाफ प्रक्रिया करावी.
  • मिथाईल युजेनॉल आणि डायक्लोरव्हॉस (76 टक्के ईसी) यांचे प्रत्येकी चार ते पाच थेंब कापसाच्या बोळ्यावर टाकून ते प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवावेत. त्याकडे नर फळमाश्या आकर्षित होतात.
  • बागेमध्ये 4-5 फूट उंचीवर हेक्टरी 10 याप्रमाणे फळमाशी सापळे टांगावेत.
  • कोकण कृषी विद्यापीठ, दापोली निर्मित‍ रक्षक सापळा हेक्टरी 4 याप्रमाणे बागेत लावावेत.
  • पिठ्या ढेकूण: कीड आणि तिची पिल्ले आंब्याच्या फळामधून आणि फळांच्या देठामधून रस शोषून घेतात. किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाण झाल्यास फळांवर चिकटपणा वाढून गुणवत्ता खराब होते.

नियंत्रण:

  • झाडाच्या बुंध्याभोवती 500 ग्रॅम मिथाइल पॅराथिऑन या किटकनाशकाची भुकटी टाकावी (Mango Pest Control).
  • झाडावर क्रिप्टोलिमस भुंगे सोडावीत.
  • भिरूड/ खोडकिडा: आंब्यावरील भिरुड ही जास्त उपद्रवी कीड आहे. अळी प्रथम साल व नंतर खोड पोखरुन आत शिरते. झाडाच्या आतील भागा खाते. भिरुड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा व विष्ठा येते. वेळीच नियंत्रण केले नाही तर संपूर्ण झाड वाळते.

नियंत्रण:

  • टोकदार तारेने झाडाच्या छिद्रातील जिवंत अळ्यांचा भोसकून नाश करावा.
  • खोडावरील ओल्या छिद्रात 10 लिटर पाण्यात 10 मिली डायक्लोरोव्हॉस किंवा क्लोरोपायरीफोस आणि 50 मिली रॉकेलचे एकत्रित द्रावण इंजेक्शनच्या साहाय्याने ओतावे.
  • पेट्रोल-रॉकेलमध्ये भिजवलेले कापसाचे बोळे छिद्रात टाकून छिद्रे चिखलाने बंद करावीत.
  • जुलै-ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर महिन्यातून किमान एकदा खोडाचे निरीक्षण करून उपाय योजावेत.
  • खोडाभोवती हलकी चाळणी करून स्वच्छता ठेवावी. ऑक्टोबर महिन्यात खोडावर जमिनीपासून 4-5 फुटावर किंवा उपफांद्यांपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. बागेतील झाडांची नेहमी पाहणी करावी (Mango Pest Control).
error: Content is protected !!