Jaggery Rate : गुळाच्या दरात घसरण; गुऱ्हाळ चालवावे कसे? शेतकऱ्यांना चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातल्यानंतर साखरेसोबतच आता गुळाच्या दरातही (Jaggery Rate) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.15) गुळाला कमाल 3901 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3851 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेल्या गुळाला चांगला दर (Jaggery Rate) मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सध्या मजुरी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुऱ्हाळ चालविणे शेतकऱ्यांना परवडत नाही. न परवडणारे गुऱ्हाळ चालवावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील गुळाचे दर (Jaggery Rate Decline Farmers Worry)

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 272 क्विंटल गुळाची आवक (Jaggery Rate) नोंदवली गेली आहे. जळगाव बाजार समितीत आज गुळाची 154 क्विंटल आवक झाली असून, गुळाला कमाल 4300 ते किमान 3600 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उत्तम प्रतीच्या गुळाची 342 क्विंटल आवक झाली असून, त्यास कमाल 3852 ते किमान 3811 रुपये तर सरासरी 3831 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर साधारण दर्जाच्या गुळाची 236 क्विंटल आवक नोंदवली गेली असून, त्यास कमाल 3791 ते किमान 3675 रुपये तर सरासरी 3733 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उत्पादन खर्चही निघेना

यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाची पुरेशी वाढ झालेली नसून, उत्पादन घटले आहे. परिणामी गुळाचे उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे. गुऱ्हाळासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. गुळाच्या एका आधणास चार ते साडेचार हजार रुपये खर्च येतो. एका आधणामध्ये दहा किलोच्या आठ ते दहा ढेपी निघतात. सरासरी एक क्विंटल गुळाचे उत्पादन होते. या गुळाला 3000 ते 3901 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो. उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुळाला बाजार समितीत किमान 60 ते 70 रुपये प्रति किलो दर मिळणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!