हॅलो कृषी ऑनलाईन : जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shivar Abhiyan) राज्यात लोकचळवळीचे स्वरूप देत, एक महत्वाकांक्षी योजना म्हणून राबविली जाणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या योजनेच्या (Jalyukt Shivar Abhiyan) दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून रविवारी (ता.26) आध्यात्मिक गुरु श्री.श्री.रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील ताज हॉटेल येथे झालेल्या या करारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री.श्री.रवीशंकर उपस्थित होते.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारची कामे करण्यात येणार आहे. यासाठी मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. या कराराद्वारे (Jalyukt Shivar Abhiyan) राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर या 24 जिल्ह्यातील 86 तालुक्यात धरणांतील गाळ काढण्याची कामे केली जाणार आहे. तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेततळ्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
नैसर्गिक शेतीसाठीही करार (Jalyukt Shivar Abhiyan 2.0 In Maharashtra)
याशिवाय राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत कृषी विभागाने सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार राज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीस चालना देणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतांवर आधारित पारंपरिक शेती ही नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतरित करणे ही कामे संस्थेकडून केली जाणार आहे.
‘जलयुक्त शिवारचे देशात यश’
‘जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 22 हजार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या 2020 मधील अहवालात राज्यातील भूजल पातळी इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सुधारली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले आहे. तर महाराष्ट्र भूमीत विषारी खते टाकून आपण तिला निष्प्रभ करतो आहोत. महाराष्ट्राची भूमी अध्यात्माची शिकवण देणारी आहे. त्यामुळे राज्यात नैसर्गिक शेतीची आवशक्यता असल्याचे श्री. श्री. रविशंकर यांनी यावेळी म्हटले आहे.