हॅलो कृषी ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि पालघर जिल्ह्यातील बहाडोली येथील जांभूळ (Jambhul) या फळाला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या बौद्धिक संपदा विभागाकडून (Jambhul) ‘जिओग्राफिकल इंडिकेशन्स’ जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या विशेष स्वादासाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील जांभळांना जागतिक पातळीवर ओळख मिळणार असून, तेथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
भौगोलिक मानांकन नोंदणी विभागाच्या माहितीनुसार, 24 मे 2022 रोजी जांभूळ (Jambhul) परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट या बदलापूरच्या संस्थेच्या वतीने बदलापूर येथील जांभूळ फळाला भौगोलिक मानांकन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे विभागाकडे केली होती. तर पालघर येथील एका शेतकरी उत्पादक कंपनीने भौगोलिक मानांकनासाठी 29 ऑगस्ट 2022 रोजी अर्ज केलेला होता. सर्व गोष्टींचे अवलोकन केल्यानंतर भौगोलिक मानांकन नोंदणी विभागाने दोन्ही ठिकाणच्या जांभळांना स्वतंत्रपणे मानांकन प्रदान केले आहे. याशिवाय राज्यातील प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील आमचूर, लाल मिरची, लातूर जिल्ह्यातील तुर डाळ, कोथिंबीर, जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या दगडी ज्वारीला आणि लातूरच्या उदगीर येथील कुंठाळगिरी खव्यालाही नोंदणी विभागाने भौगोलिक मानांकन प्रदान केले आहे.
जांभूळ खाण्याचे फायदे (Jambhul Got Geographical Classification)
जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करते, रक्त शुद्ध करते, डोळ्यांसाठीही जांभळाचे फायदे आहेत. तोंडातील व्रणासांठी जांभळाच्या पानांचा वापर करतात. मूळव्याधसाठी फायदेशीर असून, किडनीस्टोनपासून आराम मिळतो. मधुमेहाच्या उपचारासाठी मदत होते. त्यामुळे बहुविध पद्धतीने गुणकारी असणाऱ्या जांभूळ फळाला मान्यता मिळाल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जांभूळ उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक कातकरी आणि ठाकर आदिवासींबरोबरच अनेक गावांमधील शेतकरी या जांभूळ फळाच्या उत्पादनाशी थेट जोडले गेले आहेत. त्यामुळे जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करत शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला आता यश आले आहे.