Jayakwadi Dam : पाणी प्रश्न पेटला, मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) तातडीने पाणी सोडण्यात यावे. या मागणीसाठी आज (20 नोव्हेंबर) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर (सिंचन भवन) मराठवाड्यातील (Jayakwadi Dam) सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार देखील सहभागी झाले होते.

नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र असे असतांनाही नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नेत्यांनी हे पाणी रोखून धरले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तातडीने सोडावे, या मागणीसाठी आज मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जालना-संभाजीनगर महामार्ग जवळपास दोन तास रोखून धरला. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

50 आंदोलक ताब्यात (Jayakwadi Dam Rasta Roko Andolan)

आंदोलनादरम्यान महामार्ग एका बाजूने खुला ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केले. मात्र त्यास विरोध दर्शवत आताच पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी, अन्यथा आपण या ठिकाणावरून हलणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी राजेश टोपे यांच्यासह जवळपास 50 आंदोलकांना यावेळी ताब्यात घेतले. तसेच काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय इतर नेते, आमदार यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यात विदारक परिस्थिती

राज्यासह मराठवाड्यात यावर्षी पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची विदारक परिस्थिती आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरी आणि बोरवेलचे यांनी तळ गाठले आहे. विभागातील अनेक धरणांमध्येही पाणी नाही. हिवाळ्यात अशी परिस्थिती असल्याने येत्या काळात परिस्थिती आणखी विदारक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र वरील धरणांमध्येही हीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाणी सोडू नये अशी आमची भूमिका नाही. याबाबत राजकारण करू नये. नगर आणि वरील नाशिक जिल्ह्यातही पाण्याची वाईट परिस्थिती आहे. असे आवाहन नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!