हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटले मात्र अजूनही कांदा (Kanda Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांना 1 आणि 2 दोन रुपये प्रति किलोने आपला कांदा विक्री करावा लागत आहे. सोयाबीन व कापसाच्या दराची देखील तीच गत आहे. मात्र, सोयाबीन आणि कापसाप्रमाणे शेतकरी कांदा साठवून ठेऊ शकत नाही. त्यामुळे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मजबुरीने आपला कांदा बेभावात विक्री (Kanda Bajar Bhav) करावा लागत आहे. सध्याच्या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये.
सर्वाधिक दर घसरण कुठे? (Kanda Bajar Bhav Today 6 Feb 2024)
आवक जास्त होत असल्याने, सोलापूर व धुळे या दोन बाजार समितीत तर कांद्याला व्यापारी विचारात देखील नाही. त्या ठिकाणी कांद्याच्या दरात (Kanda Bajar Bhav) किमान 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत (अर्थात 1 रुपये किलो) घसरण झाली आहे. तर पुणे-मोशी, पंढरपूर, येवला या बाजार समित्यांमध्येही कांद्याचे दर किमान 200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत किमान 300 रुपये, लासलगाव बाजार समितीत किमान 400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत किमान 425 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांदा दरात घसरण झाली आहे.
सरासरी 900 ते 1100 रुपये दर
आज नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी दर 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. तर कोल्हापूर, पंढरपूर आणि कल्याण या बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचा कमाल दर 1500 रुपये प्रति क्विंटलच्या आत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची गुणवत्ता असूनही, त्यांना योग्य दर मिळत मिळत नाहीये. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला आज कमाल 1256 ते किमान 400 तर सरासरी 1100 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार आज कमाल 1401 ते किमान 425 तर सरासरी 1050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
कष्ट घेऊनही हाती अपयश
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. केंद्र सरकारने केलेल्या निर्यातबंदीमुळे मागील दोन महिन्यात आपले संपूर्ण कांदा पीक घाट्यात गेले आहे. सरकार ऐन शेतकऱ्यांचा कांदा बाजारात दाखल होण्याच्या सुमारास, निर्यातबंदी आणि निर्बंध लागू करते. ज्यामुळे शेतकरी पूर्णतः नेस्तनाबूत होतो. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कांदा पिकासाठी कष्ट घेऊनही अपयशी ठरत आहेत. यामुळे केंद्र सरकारबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.